काम बंद, रस्त्यावर मोठे खड्डे

पुणे : राजकीय हट्ट आणि प्रशासनाची घाई यामुळे कात्रज- कोंढवा रस्त्याची वाट लागली आहे. जागा संपादित नसतानासुद्धा काम सुरू करण्यात आले. आता जागाच ताब्यात नसल्यामुळे काम बंद असून, जुन्या रस्त्यालासुद्धा मोठे खड्डे पडले आहेत. काम सुरू करावयाचे झाल्यास 400 कोटी रुपये पहिल्यांदा भूसंपादनासाठी खर्च करावे लागतील. त्यामुळे आता जुनाच रस्ता पुन्हा डांबरीकरणाचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. शहरातील मुख्य रहदारीचा हा रस्ता आहे. सोलापूरहून येणारी जड वाहतूक या रस्त्याने मुंबई आणि कोल्हापूर, बेळगाव याठिकाणी जाते. त्याचबरोबर पुणे शहरातून बारामती, सासवड, जेजुरी या भागाला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. याभागाचा विकास झपाट्याने होत असून, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. यामध्ये कोंढवा बुद्रुक, कोंढवा, येवलेवाडी, गोकुळनगर याभागात मोठे गृहप्रकल्प साकारण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर गर्दी वाढली आहे.

महापालिका प्रशासनाने 2018 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या रस्त्याचे काम हाती घेतले होते. रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा पूर्ण ताब्यात आली नसतानासुद्धा कामाला सुरुवात करण्यात आली. साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे तीन वर्षामध्ये केवळ 24 टक्केच काम झाले आहे. सध्या या रस्त्याचे काम बंद आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे पूर्वीच्या रस्त्याची डागडुजीसुद्धा केलेली नाही. त्यामुळे वाहनचालकाची अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

या रस्त्यावर प्रामुख्याने मोठ्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीला दररोज सामोरे जावे लागत आहे. कोंढवा आणि येवलेवाडी भागाचा विकास मोठ्याप्रमाणात झाल्यामुळे रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. या भागात राहणार्‍या नागरिकांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

कात्रजपासून खडीमशिन चौकापर्यंत साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता आहे. ज्या ठिकाणची जागा ताब्यात आली आहे, त्याठिकाणी ठेकेदाराकडून काम करण्यात राजस सोसायटीजवळ नगरसेवक कदम यांच्या ऑफिसजवळ एक शंभर मीटरचा पॅच तयार करण्यात आला आहे. यानंतर पुढे इंडियन ऑईल पेट्रोल पंपाशेजारी काही मीटरचा रस्ता तयार करण्यात आला आहे. असे सबवेचे कामसुद्धा अर्धवट स्वरूपात करण्यात आले आहे. त्यामुळे वाहने चालवताना अतिशय काळजी घ्यावी लागत आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या रस्त्याच्या कामासाठी 350 कोटींची निविदा काढली होती. यापैकी केवळ 40 कोटींचे काम पूर्ण झाले आहे. म्हणजे प्रकल्पाच्या एकूण 24 टक्केच काम झाले आहे. महापालिकेला या रस्त्याचे पूर्ण काम करण्यासाठी 2 लाख 65 हजार चौरस मीटर जागा लागणार आहे. यापैकी केवळ 50 हजार चौरस मीटर जागा ताब्यात आली आहे. प्रत्यक्ष रस्त्याची जागा 60 हजार चौरस मीटर आहे. त्यामुळे हे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दीड लाख चौरस मीटर जागा ताब्यात आली पाहिजे.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सध्या बंद आहे. भूसंपादनासाठी जागामालक रोख मोबदला मागत आहेत. त्यामुळे आता जुना रस्ता दुरुस्त करण्यासाठी 4.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. लवकरच जुनाच रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे.

-विजय कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख

रस्त्याचे काम सुरू करण्याची घाई

कात्रज-कोंढवा रस्त्याची केवळ 30 ते 35 टक्के जागा ताब्यात आली असताना निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्यात आले. काम करण्यासाठी ठेकेदाराकडे आता जागाच शिल्लक राहिली नसल्यामुळे सध्या हे काम बंद आहे. जागेचे भूसंपादन करण्यासाठी 400 कोटी रुपये लागणार आहे. जागामालक टीडीआरच्या बदल्यात जागा देण्यास तयार नसल्यामुळे महापालिका प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

कात्रज चौकामध्ये आता एनएचआठच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. येथून वाहतूक कोंडीला सुरुवात होत आहे. कात्रज चौकातील जागासुद्धा महापालिका प्रशासनाला ताब्यात घेता आली नाही. त्यामुळे अरुंद रस्त्यावरूनच जड वाहतूक सुरू आहे. पुढे रस्त्याची रुंदी 30 ते 40 फूट आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारी जड वाहतूक आणि दुचाकी, चारचाकींमुळे बहुतेकवेळा वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा