पवार आणि परब यांचे आवाहन

मुंबई : एसटी कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा आणि कामावर परतावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सोमवारी केले. एसटीच्या विलीनीकरणाचा अहवाल तीन आठवड्यांत न्यायालयात सादर केला जाईल. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विचार करून निर्णय घेतला जाईल. तीन दिवसांत कामगारांनी कामावर परतावे. त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. काल एसटी कृती समितीची परिवहन मंत्री परब आणि शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत 22 कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत परब आणि पवार यांनी कामगारांना कामावर परतण्याचे आवाहन केले.

एसटी कर्मचार्‍यांना कारवाईबाबत आम्ही तीन वेळा मुदत दिली. या मुदतीमध्ये कामावर परतणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करणार नसल्याचे आम्ही सांगितले होते. आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचार्‍यांवर निलंबनाची किंवा बडतर्फीची कारवाई झाली नाही, अशा कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे. त्यांच्यावर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे परब यांनी सांगितले. त्यानुसार, कृती समितीमधील संघटनांनी कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.आपली जनतेशी बांधिलकी आहे. काही लोकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असावा, पण कुठंपर्यंत जावे हे समजायला हवे होते. मला राजकारण करायचे नाही. प्रश्न सोडवायचा आहे. कृती समितीने मांडलेल्या काही प्रश्नांवर परिवहन मंत्र्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली, असे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांची बाजू मांडत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी संघटना भडकल्या आहेत. त्यांच्या आक्रस्ताळेपणामुळे चूल बंद होण्याची वेळ आल्याचा आरोप एसटी संघटनांनी केला आहे. दुसरीकडे, शरद पवार काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल सदावर्ते यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा