पुणे : उत्तरेकडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंड वारे वाहत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मध्य महाराष्ट्रात आणखी थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे, तर विदर्भात आणखी तीन दिवस मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज हवामान विभागाने बुधवारी वर्तविला आहे. दरम्यान, नाशिकचे किमान तपमान 10 अंशापर्ययत घटले आहे.
कोकणात चक्रकार वार्‍याची स्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. त्यास अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यामुळे विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. मागील 24 तासात विदर्भात भंडारा, गोदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात दिवसभर हवामान कोरडे होते. मराठवाड्यात बर्‍याच ठिकाणी किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात किचिंत वाढ झाली.
येत्या शनिवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे असणार आहे. काल राज्यात नाशिक येथे निच्चांकी 10 अंश किमान तपमानाची नोंद झाली. पुणे शहर आणि परिसरात मागील चार दिवसांपासून थंडीत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात सर्वत्र धुके पसरत आहे. दोन दिवसानंतर किमान तपमानात वाढ होणार आहे. मात्र उत्तरेकडील थंड वार्‍यामुळे मध्य महाराष्ट्रात थंडी कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा