किलोमागे चार ते पाच रुपयांची वाढ
पुणे : संक्रातीसाठी तिळाची चिक्की, लाडू तयार करण्यासाठी वापरला जाणारा चिक्की गूळ महाग झाला आहे. मागीलर्षीच्या तुलनेत चिक्की गुळाच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. चिक्की गुळाला गृहिणींकडून चांगली मागणी असून इंधन दरवाढीमुळे चिक्की गुळाच्या दरात वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी मंगळवारी दिली.
बोथरा म्हणाले, संक्रातीला तयार करण्यात येणार्‍या गूळपट्टी, तीळपट्टी, तिळाचे लाडू, शेंगदाणा लाडू तयार करण्यासाठी चिक्की गुळाचा वापर केला जातो. साध्या गुळाच्या तुलनेत चिक्की गूळ मिश्रणाला धरून ठेवणारा असतो. त्यामुळे संक्रातीला गृहिणींकडून दरवर्षी चिक्की गुळाला मोठी मागणी असते. मिठाई विक्रेते साखरेचा वापर करत असल्याने गृहिणी संक्रातीला घरीच तिळाचे लाडू, तीळपट्टी तयार करतात. चिक्की गुळाची बाजारात आवक वाढली आहे. इंधन दरवाढीमुळे मागीलवर्षीच्या तुलनेत चिक्की गुळाच्या दरात किलोमागे चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. सुमारेे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुर्‍हाळ चालक चिक्की गूळ तयार करण्यास सुरुवात करतात. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर बाजारात चिक्की गूळ विक्रीस पाठविला जातो. असेही बोथरा यांनी नमूद केले.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून दौंड, दापोली, सुपणे तसेच सांगली, कराड, पाटण भागातून चिक्की गूळ विक्रीस पाठविला जातो. सध्या मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आठ ते दहा ट्रकमधून गूळ विक्रीस पाठविला जात आहे. चिक्की गुळाची एक हजार ते बाराशे खोकी विक्रीस पाठविली जात आहे. एका खोक्यात 18 ते 20 किलो चिक्की गूळ असतो. तीळवडी, लाडूसाठी गृहिणी वेलदोडे, सुंठ, आले तसेच तीळ, खोबरे, शेंगदाणा या मिश्रणांचा वापर करतात. मिश्रणाला धरून ठेवण्याची क्षमता चिक्की गुळात असते. एक किलो ते अर्ध्या किलोच्या वेष्टनात चिक्की गूळ बाजारात उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात एक किलो चिक्की गुळाचा दर 55 ते 60 रुपये आहे. साध्या गुळाचे दर स्थिर असून किरकोळ बाजारात एक किलो गुळाचे दर 40 ते 45 रुपये आहेत.
चहासाठी गुळाला मागणी
बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच साखरेच्या तुलनेत गुळ आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे अनेक जण गुळाच्या चहाला पसंती देत आहेत. त्यामुळे गुळाच्या चहाच्या मागणीत वाढ झाली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक अमृततुल्य चालक सध्या गुळाचा चहाची विक्री करत आहेत. परिणामी गुळाला मागणी वाढत आहे. विशेषत: पुण्यात गुळाच्या चहाला ग्राहकांची सपंती असल्याने गुळाचा चहा विक्रेत्यांची संख्याही वाढली असल्याचे जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा