विनय पुराणिक

पुणे : राज्यातील मंत्री, आमदार, खासदारांच्या सदनिका, बंगले (निवासस्थाने) हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. परंतु, यावेळी एका पंचायत समिती सदस्याने चर्चेला पूर्णविराम देत, थेट आमदार, खासदारांच्या घरावर डोळा ठेवत त्यावरच हात फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न पुणे गृहनिर्माण विकास महामंडळाच्या (म्हाडा) अधिकार्‍यांनी हाणून पाडला असला, तरी तो चर्चेचा विषय होत आहे.

म्हाडातर्फे आर्थिक गटनिहाय विविध क्षेत्रातील श्रेणीद्वारे (कोटा) सदनिका, भूखंडांसाठी सोडत जाहीर होत असते. नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने नोव्हेंबर 2020 या आर्थिक वर्षातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यासाठी चार हजार 222 घरांसाठी लॉटरी काढली होती. यामध्ये लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांसाठी राखीव प्रवर्ग निश्चित करण्यात आलेला आहे. त्याव्यतिरीक्त इतर प्रवर्गातून नागरिकांना सदनिकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते.

या लॉटरीची सोडत नववर्षाच्या सुरवातीच्या आठवड्यात जाहीर झाली. आमदार, खासदार प्रवर्गातून खराडी (स्किम क्रमांक 488) परिसरातील व्ही. जे. 67 के, इन्क्ल्युसिव हाउसिंग येथील सदनिकेसाठी एक अर्ज प्राप्त असून तो बिनविरोध मंजूर होत विजेता झाल्याचे निष्पन्न झाले. रोहन दिलीप बाठे असे विजेत्या व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती ना आजी ना माजी विधानसभा, लोकसभा सदस्य! बाठे हे भोर पंचायत समिती सदस्य असून उपसभापतीपदी आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण येताच अनेकांनी याबाबत नापसंती व्यक्त केली, तर अनेकांनी बाठेंच्या नजीक असणार्‍या आमदार, खासदारांच्या शिफारशीनुसार अर्ज भरला असेल, अशी मतमतांतरे सुरू झाली.

मात्र, शिफारस जरी असली, तरी थेट लोकप्रतिनिधींच्या प्रवर्गातून सदनिकेवर दावा करता येत नसल्याने म्हाडाच्या नियमावलीत असताना, पंचायत समिती सदस्य असताना बाठे यांनी कोणत्या हेतूने अर्ज भरला आहे, याबाबत प्रश्न कायम आहे. दुसरीकडे बाठे यांनी अर्ज भरून आमदार, खासदारांच्या प्रवर्गातून मिळणार्‍या घरांवरच दावा करण्याचे धाडस केल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

म्हाडाच्या सदनिका सोडतीमध्ये माझा अर्ज कोणत्या प्रवर्गात भरला आहे, याबाबत मला कुठलीच कल्पना नाही. संबंधित अर्ज माझ्या मित्राने भरला आहे.

  • रोहन बाठे (उपसभापती, भोर पंचायत समिती)

संबंधित प्रवर्गातून शिफारस केली, तरी अशी सदनिका देण्यात येत नाही. त्यामुळे कागदपत्रांच्या स्क्रुटीनी दरम्यान बाठे यांचा अर्ज नामंजूर करण्यात येईल. कारवाईबाबत कुठलाही नियम नसल्याने अर्ज बाद केल्यावर प्रश्न मिटतो.

  • नितीन माने पाटील
    (मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे विभाग)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा