पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. परिणामी नाटकांचे तसेच चित्रपटांचे रात्रीचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. नाट्यगृहाच्या चारमाही तारीख वाटपाला उत्तम प्रतिसाद मिळाला तरी त्याखेरीज नाट्यगृहाचे बुकिंग निर्बंधांमुळे कमी झाले आहे. राज्यात सुरू झालेले नाट्यप्रयोग रद्द होऊ लागले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सोमवारपासून रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू झाली आहे. याचा परिणाम म्हणून रात्रीचे नाट्यप्रयोग आणि रात्री आठनंतरचे चित्रपटाचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. अमर फोटो स्टुडिओ नाटकाचा 16 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील रात्रीचा तसेच 22 जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिरातील एका लग्नाची दुसरी गोष्ट नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे.
संचारबंदीमुळे नाटकांचे रात्रीचे प्रयोग रद्द झाल्याचे रंगमंदिर व्यवस्थापक सुनील मते आणि नाट्यव्यवस्थापक प्रवीण बर्वे यांनी सांगितले. नाट्यगृहामध्ये पन्नास टक्के प्रेक्षक संख्येच्या क्षमतेनुसार साधारण पाचशे तिकिटांची विक्री होऊ शकते. प्रत्येक प्रयोगाला चारशे लोक उपस्थित असतात, असे बर्वे यांनी सांगितले. चित्रपटगृहात सुरू असलेले पुष्पा, 83, स्पायडरमॅन या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. बहुतेक सर्व बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये शेवटचा शो रात्री आठ वाजता ठेवण्यात आला आहे.
दिवाळीनंतर नाट्य प्रयोगांचे उत्साहात आयोजन होऊ लागले; पण प्रतिसाद कमी झाल्याने निर्माते सावध झाले आहेत. प्रयोग आयोजित करण्याचे धाडस करायचे का, हा विचार निर्माते करत आहेत. प्रयोगांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे. पालिकेच्या नाट्यगृहांच्या एप्रिलपर्यंतच्या तारखांचे वाटप पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यांच्या तारखांची नोंदणी झालेली असली तरी त्यावर नाटकाचा प्रयोग ठरलेला नाही. राज्यातील नाटकाचे दौरे पुन्हा रद्द होऊ लागले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा