पुणे : निवृत्त लेफ्टनंट कर्नल श्रीकांत हसबनीस यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने खासगी रूग्णालयात रविवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनाथ हिंदू महिलाश्रमाच्या स्थापनेपासून लोकमान्य टिळक यांच्या स्नुषा शांताबाई टिळक आणि कमलाबाई हसबनीस यांचा सक्रीय सहभाग होता. श्रीकांत हसबनीस हे कमलाबाई हसबनीस यांचे चिरंजीव होत. हसबनीस यांनी संस्थेच्या कार्यकारिणीवरदेखील काम केले आहे.
हसबनीस यांना शनिवारी ह्दयविकाराचा झटका आल्याने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच रविवारी पुन्हा त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. हसबनीस यांचा 1962 च्या भारत-चीन युद्धात सहभाग होता. या युद्धाच्या वेळी गलवान येथे त्यांची तुकडी कार्यरत होती. तसेच 1971 च्या भारत बांगलादेश युद्धातही त्यांचा सहभाग होता. या युद्धात हसबनीस यांच्या तुकडीने शत्रुराष्ट्राच्या तब्बल चार हजार सैन्यांना कैदी केले होते. या युद्धात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेही ताब्यात घेतली होते. त्यांच्या या कामगीरीसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले होती. त्यांनी मिझोहिल्समध्ये केलेल्या कार्याची दखलही सरकारने घेऊन त्यांचे कौतुक केले होते. त्यांनी आळंदी देवस्थानचे पंच म्हणूनही काम केले आहे. त्यांनी सलग 25 वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी वारी देखील केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा