मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. मुंबईत सलग दुसर्‍या दिवशी 20 हजार नव्या रुग्णांची भर पडली. तर राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. दुसरीकडे, मंत्रालयातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध आणखी कठोर केले जाणार आहेत. रात्रीची संचारबंदी आणि विकेंड लॉकडाउनची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सचिवांनी काल राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी ऑनलाईन द़ृश्यप्रणालीद्वारे चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांना याचा अहवाल सादर करण्यात आला.

राज्यात काल कोरोनाच्या तब्बल 40 हजार 925 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकीकडे, चिंता वाढवणारे आकडे समोर येत असताना समाधानाची बाब म्हणजे कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. काल 14 हजार 256 रुग्ण बरे होऊन घरी परतले. संसर्गाची तीव्रता कमी असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. सध्या राज्यात 7 लाख 42 हजार व्यक्ती गृहविलगीकरणात, तर 1463 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. काल राज्यात एकही नवीन ओमिक्रॉन रुग्ण आढळला नाही. राज्यात सध्या 1 लाख 41 हजार 492 सक्रिय रुग्ण आहेत. काल मुंबईत 20 हजार 971 ठाणे शहरात 2,612, नवी मुंबईत 2,664 रुग्णांची नोंद झाली. काल आढळून अलेल्या 41 हजार रुग्णांपैकी तब्बल 33 हजार 235 रुग्ण मुंबई, ठाणे रायगड व पालघर परिसरातील आहेत. याशिवाय पुण्यात 2,804, पिंपरी-चिंचवडमध्ये 979, नागपूरमध्ये 612 रुग्णांची नोंद झाली.

मंत्रालयात कोरोनाचा उद्रेक

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असताना राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयालाही कोरोनाचा विळखा पडला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालयातील 21 व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातीलही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्य सरकारमधील 10 मंत्री व 70 हून अधिक आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. आता मंत्रालयातील कर्मचार्‍यांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. वळसे-पाटील यांच्या कार्यालयातील चार कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर सर्वच कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या खासगी सचिवांसह 21 जणांना संसर्ग झाल्याची माहिती पुढे आली आहे. आणखी 15 जणांचा अहवाल यायचा आहे.

छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील व त्यांच्या विभागातील अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मंत्रालयातील तीन दालने सील करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालय व शासकीय कार्यालयातील उपस्थिती पुन्हा 50 टक्क्यांवर आणण्याचा विचार सुरू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा