पुणे : मराठी नाट्यसृष्टीमध्ये नाट्यरसिकांच्या निवडीतून दिला जाणारा ‘नाट्यदर्पण पुरस्कार’ या संकल्पनेचे प्रणेते आणि ’नाट्यदर्पण प्रतिष्ठान‘चे संस्थापक सुधीर श्रीकृष्ण दामले यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि ‘सुदर्शन रंगमंच’च्या शुभांगी दामले या त्यांच्या भावजय होत.
गणेश सोळंकी यांच्या सल्ल्याने आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने 1975 मध्ये दामले यांनी नाट्यदर्पण पुरस्कार सुरू केले. ते वितरित करण्यासाठी भव्य ‘नाट्यदर्पण रजनी’चे आयोजन ते करत असत. मराठी नाट्यसृष्टीमध्ये या पुरस्काराचे आणि नाट्यदर्पण रजनीचे महत्त्व वादातीत होते. नाट्य, संगीत आणि चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार त्या प्रतिष्ठेतेच्या पुरस्कार सोहळ्यात प्रेमाने हजेरी लावत. हजारो नाट्यप्रेमी रसिकही ही रजनी वर्षानुवर्षे ‘हाऊसफुल्ल’ करत. पंचवीस वर्षे सातत्याने नाट्यपर्दण रजनीचे गारुड संपूर्ण नाट्यसृष्टीवर होते. रसिकांच्या मनांमध्ये हे प्रेम आणि औत्सुक्य शिखरावर आहे अशा वेळीच निरोप घेणे योग्य या भावनेतून 25वी नाट्यदर्पण रजनी झाल्यावर 1999 मध्ये दामले यांनी या उपक्रमाची सांगता केली.
या पुरस्कार सोहळ्याच्या बरोबरीने ‘नाट्यदर्पण विशेषांक’ आणि ‘कल्पना एक-आविष्कार अनेक’ ही संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय असलेली एकांकिका स्पर्धा हे उपक्रम नाट्यदर्पण प्रतिष्ठानतर्फे सुमारे 20 वर्षे त्यांनी चालविले. हे उपक्रम बंद केल्यानंतर गेली काही वर्षे त्यांचे वास्तव्य पुण्यात होते. येथेही सु-दर्शन रंगमंचच्या विविध उपक्रमांना त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा