पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. शनिवारी प्रशासनाने मॅकेनिक विभागातील कर्मचार्‍यांच्या मदतीने तीन लालपरी सोडत असताना संपकरी कर्मचार्‍यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांत वादावादी झाली. मात्र दीर्घ कालावधीनंतर स्वारगेट बस स्थानकातून काल लालपरी धावली.
जिल्ह्यातील काही बस स्थानकातील संप मोडून काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. स्वारगेट बस स्थानकातून मॅकेनिकच्या मदतीने बस सोडून संप मोडून काढण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाने केला. त्यामुळे आंदोलक कर्मचार्यांनी गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला. पुणे विभागातील दौंड, भोर, बारामतीमधून संप मोडून काढण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले आहे; परंतु, स्वारगेट स्थानकातील कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत.
तीन बस सोडण्यात येत असल्याचे लक्षात येताच संपकरी कर्मचारी गाड्यांसमोर उभे राहिले. त्यांनी एसटी प्रशासन मॅकेनिकमार्फत गाड्या सोडून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला. दरम्यान, हे वाद थांबविण्यासाठी स्थानिक पोलिसांना यावेळी मध्यस्थी करावी लागली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा