सत्ताधारी राष्ट्रवादी गटाला 8 जागा; 6 जागा जिंकणारी शिवसेना ठरवणार अध्यक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतच झुंज पाहण्यास मिळाली. तर भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादीला मदत केली. राष्ट्रवादीने गड राखला असला तरी किंगमेकर मात्र शिवसेना ठरली आहे. सत्ताधारी गटातील 8 उमेदवार तर, विरोधी गटातील 6 उमेदवार विजयी झाले.

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची दमछाक झाली आहे. शिवसेनेने कडवी झुंज दिल्यामुळे निवडणुकीत रंगत आली. 15 जागांपैकी सत्ताधारी गटाला 8 जागा जिंकता आल्या तर, विरोधी गटाने आतापर्यंत 6 जागांवर मुसंडी मारली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता होती. पण, जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवली. तर, भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत केली. बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सत्तारूढ गटाचे नेतृत्त्व केले.

तर, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सत्ताधारी गटाला कडवी झुंज दिली. विरोधी गटाने सहा जागांवर विजय मिळवला. त्यामुळे आता खासदार मंडलिक यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अध्यक्षपद शिवसेनाच ठरवणार असल्याचे चित्र आहे. हा निकाल हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा