पुणे : शहर आणि जिल्ह्यातील बस स्थानकातून सुमारे 15 ते 20 दिवसांपासून सर्व प्रकारच्या मिळून रोज 150 बस धावत आहेत. धावणार्‍या बसची संख्या ‘जैसे थे’ असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे मागील पंधरा दिवसांत कामावर हजर होणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अत्याल्प आहे. त्यामुळे विविध मार्गावरील बवची संख्या कधी वाढणार असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.
शहर आणि जिल्ह्यातील कामगारांची संख्या 4 हजार 275 इतकी आहे. त्यापैकी दोन महिन्यांत केवळ एक हजार 39 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. कर्मचारी कामावर हजर झाले नसल्याने मार्गावरील बसची संख्याही वाढत नसल्याचे वास्तव आहे. पुण्यात एकुण उपलब्ध बसच्या तुलनेत केवळ 10 ते 15 टक्के बस मार्गावर धावत आहेत. त्यामुळे अद्यापही सुमारे 85 टक्के बस डेपोतच थांबून आहेत. मोजक्या बसमुळे प्रवाशांनाही बस स्थानकात बससाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.
पुणे हे पश्चिम महाराष्ट्रातील अंत्यत महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे येथून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या प्रचंड मोठी आहे. तसेच धावणार्‍या बसची संख्याही लक्षणीय आहे. मात्र एकट्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील 3 हजार पेक्षा अधिक कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे सुमारे दोन महिन्यांपासून प्रवाशांची गैरसोय कायम आहे. प्रसंगी खासगी वाहनांने प्रवास करण्याचा निर्णय घेतल्यास त्यासाठी प्रवाशांनी एसटीच्या तिकीटापेक्षा अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. याचा ताणही प्रवाशांच्यांच खिशावर पडत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि प्रशासनाच्या वादात प्रवासी मात्र सर्वार्थाने भरडले जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा