मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली, तरी फारच कमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते आहे. ऑक्सिजन व हॉस्पिटल बेडची कोणतीही अडचण नाही. त्यामुळे सध्यातरी लॉकडाउन किंवा मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा बंद करण्याचा कोणताही विचार नाही. तसेच, राज्यात कुठेही जिल्हाबंदी केली जाणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी स्पष्ट केले.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आरोग्य मंत्री राजेश टोपे व आरोग्य विभागातील ज्येष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सरकारने केलेली तयारी, रुग्णसंख्या वाढल्यास कशा पद्धतीने आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे? याबाबत पवार यांनी माहिती घेतली आणि सूचनाही दिल्या.

संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक निर्बंध घाला, या निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करा. अत्यावश्यक नसलेल्या सेवांमुळे जर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असेल, तर त्याबाबत अधिक कठोर निर्णय घेण्याची गरज भासली तर ते घ्या, असे पवार यांनी सांगितले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर याची माहिती दिली.

गर्दी रोखण्यासाठी निर्बंध

मुंबई, पुणे, ठाण्यातील शाळा, तसेच राज्यातील महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. पण, शाळा-कॉलेज बंद केल्यानंतर या वयोगटातील तरुण-तरुणी मॉल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी करू लागले, तर उद्देश साध्य होणार नाही. याबाबतही कालच्या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. लशीकरण, औषध, निर्बंधांवर चर्चा झाली. सार्वजनिक कार्यक्रम, लग्नसोहळ्यांमधील संख्येच्या मर्यादेची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे टोपे यांनी सांगितले

१० जानेवारीपासून बूस्टर डोस

राज्यातील 70 ते 80 लाख नागरिकांनी अजून लशीचा पहिली मात्राही घेतलेली नाही. त्यांनी लस घेतलीच पाहिजे. तसेच पहिली लस घेतल्यानंतर दुसर्‍या लसीची तारीख उलटून गेल्यावरही अनेकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. यांच्या लशीकरणासाठी मोहीम घेण्यात येणार आहे. तसेच फ्रंटलाईन व हेल्थ वर्कर्स, सहव्याधी असलेल्या व्यक्ती व वयाची साठी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना 10 जानेवारीपासून बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यावरही चर्चा झाली, असे टोपे यांनी सांगितले.

राज्यात ३६ हजार नवे रुग्ण

मुंबई : गेल्या 24 तासांत कोरोनाचे 36 हजार 265 नवे रुग्ण आढळून आले. त्यापैकी, 20 हजार 181 रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले. गेल्या 24 तासांत 8 हजार 907 रुग्ण बरे झाले. तर, 13 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 1 जानेवारीला 6 हजार 347 नवे रुग्ण आढळून आले होते. बुधवारी 15 हजार 166 रुग्णांची नोंद झाली होती. काल 20 हजारांचा टप्पा रुग्णसंख्येने ओलांडला.

मुंबईतील ७१ पोलिसांना कोरोना

मुंबई, (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला असून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला आहे. यामुळे 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गुरूवारी दिली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत अनेक पोलिसांना जीव गमवावा लागला होता. तिसर्‍या लाटेचा मुंबईत मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. शहराच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांमध्ये याचा संसर्ग झाला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 71 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, पोलिस दलातील सक्रिय रुग्णसंख्या आता 265 वर पोहोचली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना 24 तास ड्युटी करावी लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा