पुणे : शहरातील अनेक पंपावर गुरूवारी सीएनजीचा तुटवडा जाणवला. त्यामुळे सकाळपासूनच पंपावर रिक्षासह चारचाकी वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. लांबच लांब रांगांना कंटाळून अनेकांनी रिक्षा बंदच ठेवल्याचे रिक्षा चालकांनी सांगितले. आणखी पाच दिवस शहरात सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवणार असल्याचे सांगितले जात आहे.
एनएनजीएल कंपनीच्या मुख्य गॅस पुरवठा करणार्‍या पाईपलाईनच्या देखभाल दुरूस्ती कामाला सुरूवात झाली आहे. हे काम येत्या मंगळवारपर्यंत चालणार आहे. त्यामुळे पुढचे पाच दिवस सीएनजी गॅसचा तुटवडा जाणवू शकतो. पहिल्याच दिवशी तुटवडा जाणवल्याने शहर आणि उपनगरातील बहुतांश सीएनजी पंपावर वाहनांच्या रांगा पाहण्यास मिळाल्या. रिक्षाच्या टाकीत एका वेळी चार किलोच गॅस भरता येतो. त्यामुळे रिक्षाचालकांना अधिकचा गॅसही साठवून ठेवता येत नाही. एकदा टाकी फुल्ल केल्यास दीड दिवस रिक्षा चालते. त्यानंतर पुन्हा गॅस भरावा लागतो. मात्र गॅसचा तुटवडा असल्याने ज्या ठिकाणी गॅस उपलब्ध आहेत, तेथे निम्मा दिवस रांगेत घालवावा लागल्याने रिक्षाचालकांनी नाराजी व्यक्त केली.
शहरात सुमारे एक लाखापेक्षा अधिक रिक्षा सीएनजी गॅसवर चालतात. सीएनजीवर चालणार्‍या चारचाकी वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे या सर्व वाहनचालकांना दिवसभर गैरसोयीचा सामना करावा लागला. शहर आणि उपनगरात सीएनजी गॅसच्या पंपांची संख्या सुमारे 25 ते 30 इतकी आहे. मात्र काल काही पंपांवर गॅस उपलब्ध होता, तर काही पंप गॅसअभावी बंदच होते. जेथे गॅस उपलब्ध होता तेथे सकाळपासूनच रांगा लागल्या असल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा