पुणे : देदीप्यमान परंपरा असणार्‍या लोकमान्यांच्या ‘केसरी‘ने मंगळवारी 142 व्या वर्षात पर्दापण केले. वर्धापनदिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, साहित्य, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रांतील नागरिकांनी ‘केसरी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. यंदा कोरोनामुळे स्नेहमेळावा होऊ शकला नाही. मात्र प्रदीर्घ काळापासून असलेल्या ऋणानुबंधामुळे ज्येष्ठांसह वाचकांनी दूरध्वनी, समाज माध्यमांसह प्रत्यक्ष कार्यालयात भेटून शुभेच्छा दिल्या. ‘केसरी’चे जनमानसातील स्थान कायम राहणार आहे, अशी भावना या सर्वांनी व्यक्त केली.
वर्धापनदिनानिमित्त टिळकवाडा विद्युत रोषणाईने झगमगून गेला होता. ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी केसरीचे विश्वस्त सरव्यवस्थापक डॉ. रोहित टिळक, विश्वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक, विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, केसरीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा