जर्मनी : पंजाबमधील लुधियाना येथील न्यायालयात झालेल्या स्फोटाप्रकरणी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार जसविंदर सिंग मुल्तानी याला जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. भारत सरकारने जर्मनी सरकारला विनंती केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुल्तानी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या सूचनेनुसार काम करत होता. धक्कादायक म्हणजे जसविंदर सिंग दिल्ली आणि मुंबईतही दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखत होता, अशी माहिती समोर आली आहे. याच आरोपांखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

लुधियाना न्यायालयाच्या आवारात गुरुवारी स्फोटाची घटना घडली. त्यात एकाचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. न्यायालयाच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील शौचालयामध्ये हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यावेळी जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू होते. या स्फोटात कंपाऊंडच्या भिंतीचे नुकसान झाले आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही वाहनांच्या काचा फुटल्या होत्या.

४५ वर्षांचा जसविंदर सिंग मुल्तानी बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या संघटनेशी संबंधित दहशतवादी असून संघटनेचे संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू याच्या जवळचा मानला जातो. जसविंदरवर फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागाचाही आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा