भालचंद्र पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेबांची इतिहास सांगणारी ओजस्वी वाणी संपूर्ण महाराष्ट्राने आतापर्यंत ऐकली, पाहिली. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसावर त्यांच्या शिवशाहिरीचे गारुड अजूनही सुस्पष्ट आहे. दहा दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले, मात्र त्यांच्या या प्रचंड कामगिरीच्या आठवणी तुम्हा आम्हांमध्ये तितक्याच टवटवीत आहेत. उत्कट शिवभक्ती, इतिहासातील संशोधन, अमोघ वक्तृत्व शैली आणि जाणता राजाचे दिग्दर्शक, लेखक, सूत्रधार, निर्माते म्हणून आपण त्यांना ओळखतोच. आज मात्र त्यांच्या कल्पना विलासातून आलेल्या काही प्रसंगांचे संस्मरण त्यांचे निकटवर्ती भालचंद्र पुरंदरे यांनी व्यक्त केले आहे. इतिहासकार म्हणून आपण ओळखत असलेल्या या दिग्गज व्यक्तिमत्वाचा ‘अनोळखी; पैलू यातून आपल्याला दिसतो. बाबासाहेबांच्या जाणता राजा, आग्रा,कलावंतिणीचा सज्जा, पन्हाळगड, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदऱ्यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजऱ्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड अशा विपुल लेखनातील काही प्रसंग अगदी थोडक्यात भालचंद्र पुरंदरे यांनी मांडले आहेत.
बाबासाहेबानी विविध कथांच्या माध्यमातून त्यांनी जो कल्पनांचा प्रवास केला त्याचा हा धावता आढावा.

सरसेनापती प्रतापराव गुजर यांची कथा सांगताना बाबासाहेबांनी जे नमन लिहिले ते असे होते,
गणपते विघ्नहारिते सृजन तारिते
शारदा वरा रसरक्ता समर देवते हाच घ्या मुजरा.

इथे त्यांनी शारदेला रस रक्त समर पूजीते ही जी उपमा दिलेली आहे ती विलक्षण आहे. याच कथेमध्ये प्रतापराव संतापले असताना त्याच रागाच्या भरात काही सहा मावळ्यांकडे पहिले आणि त्यापैकी एक बातमी सांगणारा स्वार तिथेच उभा होता. त्याला दिसले होते प्रतापराव संतापले आहेत. इथे त्यांनी अशी कल्पना केली की, बातमी सांगणाऱ्या स्वाराला ही दिसत होते की, आपला सरसेनापती मृत्यूच्या दारात निघाला आहे. त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला असेल आणि तो काय म्हणाला असेल,” धनी थांबा ! तो ज्या आर्ततेने बोलला असेल ती कल्पना बाबासाहेबांनी इथे केलेली दिसते. ”तो घोडेस्वार म्हणतो धनी.. धनी गनिम अफाट आहे, कापून संपायचं नाही.. मागे फिरा धनी मागे फिरा. भलूल खान पठाण हजारो घोडदळासह दौडत येतोय. समदी गाव चोंडाळत येतोय धनी”.. आणि इथे बाबासाहेब ती आर्तता व्यक्त करताना म्हणतात,” आई भवानीची आन तुम्हाला माग फिरा धनी माग फिरा. हजारो हजारो बरगंदास पठाण आग ओकीत कडाडत येताते धनी माग फिरा..थांबा धनी थांबा धनी.आजऱ्यास बसलेली आपली फौज तरी घेऊन चला.असं एकल दुकल जाऊ नका धनी असं, पाया पडतो, माघारी फिरा धनी माघारी फिरा.. तुम्हांसीं खंडोबाची आन, तुम्हांसीं तुमच्या पोराबाळांची आन, तुम्हांसीं महाराजांची आन, तुम्हांसीं आऊसाहेबांची आन, मागं फिरा धनी माग फिरा.”या लेखनामध्ये इतकी आर्तता व्यक्त केली आहे,तो आहे बाबासाहेबांचा कल्पना विलास.

बाबासाहेबांचे दुसरे नाटक म्हणजे ‘फुलवंती’. या नाटकाची थोडक्यात कथा अशी होती फुलवंती नावाची एक नर्तिका श्रीमंतांच्या दरबारामध्ये एक पैज लावली. ती पैज व्यंकटेश शास्त्री नावाच्या एका पंडितांशी. एक पंडित आणि एक नर्तिका यांच्यातील ही पैज. ती पैज फुलवंती हरते. पैजेच्या अटीनुसार फुलवंतीला पंडितांच्या हवाली करावे असे ठरते. पण त्यावेळी व्यंकटेश शास्त्री जे बोलतात हे वर्णन बाबासाहेबांनी जे केले आहेत ते एक खानदानी साहित्याचा नमुना आहे.
पंडित म्हणतात,” होय श्रीमंत तिची योग्यता तिला कळालीच नव्हती. आपली योग्यता समजण्यासाठी प्रत्येक कलावंतांला आणि पंडितांना आपल्यातील दोष उमजावे लागतात ते त्यांना समजून घ्यावे लागतात. फुलवंती असामान्य कलावंत खरीस पण मिळलेल्या यशाने आणि किर्तीने ती धुंदावली होती. तिच्या गळ्यात अहंकार हुंकारत होता आणि पायातून अहंकार झंकारात होता. कसे नेमके शब्द वापरून त्यांनी ते पात्र मांडले आहे. शास्त्रीबुवा जरी बोलत असले तरी त्या मागे प्रत्यक्ष बाबासाहेबांचे साहित्यिक श्रेष्ठत्व आहे हे लक्षात येते. ”कलावंताने, विद्यावंताने, संन्याशाने, सेनापतीने कधीही अहंकारी असू नये. एवढा मोठा संदेश बाबासाहेबांनी एका वाक्यात सर्वांसाठी दिला आहे. केव्हा पराभव होईल याचा नेम नसतो. आत्मविश्वास असावा घमेंड नसावी.” हा मोलाचा संदेश दिला आहे. महत्वाकांक्षा असावी पण नैराश्य नसावे. महत्वाकांक्षेशिवाय प्रगती नाही हे खरेच. पण सर्वोच्च यश मिळाल्यावरही ‘श्रीकृष्णापर्णामस्तु’. हा इतका मोलाचा संदेश बाबासाहेबांनी या कथेतून दिला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण जीवनात जे अध्यात्म जोपासले त्याचे हे सार आहे ‘श्रीकृष्णापर्णामस्तु’. पुढे ते लिहितात,” आहे त्या पेक्षा ही फुलवंती थोर कलाकार होऊ शकली असती, नव्हे तिने होयलाच हवे. सध्या ती नाचते ती जीव पाखरुन, पण तिने नाचायला हवे ते जीव ओतून. कसे नेमके शब्द प्रयोग केले आहेत बघा. म्हणून ते म्हणतात अहंकार नसावा सोहंकार असावा. एक जीव होऊन भक्ती केल्याशिवाय कला आणि परमेश्वर प्राप्त होत नाही. इतकी सुरेख वाक्य बाबासाहेबांच्या आध्यात्मातून आलेली दिसतात. शास्त्रीबुवा म्हणतायत,” मी तिखट कडवट बोलायला नको होत. मी तिचा अहंकाराचा लेप खरवडायला गेलो. पण माझं नख तिच्या काळजाला लागलं. मला फार वाईट वाटतंय श्रीमंत मी जे बोललो ते अपमान करण्यासाठी नाही तर तिच्यातील तेज जागे करण्यासाठी.तिच्यामधील खरी कलावंत तपस्विनी जागी करण्यासाठी बोललो. केवढा मोठा गर्भितार्थ दडला आहे बाबासाहेबांच्या या शब्दांत. जरी हे प्रसंग इतिहासातील असले तरी यामागे बाबासाहेबांचे विचार दिसतात.

जाणता राजा या महानाट्यातील राज्याभिषेकाचा प्रसंग. महाराज प्रतिज्ञा घेत असतात. या प्रसंगातील शब्द हे बाबासाहेबांचे असले तरी ते कालातीत आहेत. राजाची भूमिका ही राज्य चालवताना कशी असली पाहिजे हे वर्णन करताना बाबासाहेब लिहितात,” ही पृथ्वी माझी पत्नी असून ही प्रजा माझी अपत्य आहेत. मी त्यांचे राजा या नात्याने अत्यंत मायेने पालन, पोषण, संरक्षण करीन. असा हा त्रिकाल बाधित सत्य संदेश बाबासाहेबांनी दिलेला दिसतो. राजा आणि प्रजेतील नाते कसे असावे याचे अगदी थोडक्यात आणि नेमक्या शब्दांत वर्णन केलेले दिसते.

याच नाटकातील आणखी एक प्रसंग म्हणजे महाराज, सोयराबाई, जिजाऊ साहेब यांच्यातील. महाराज मोहिमेवर निघाले आहेत. सोयराबाई अत्यंत काळजीत आहेत. येथे जिजाऊबाई साहेब सोयराबाईंना समजावताना म्हणतात,”सोयरा शिवबाशी लग्न म्हणजे अखंड कपाळी चिंतेचे बाशिंग, डोळ्यांत आसवांच्या मुंडावळ्या आणि विरहाचा अखंड अंतरपाट पण गळ्यात मात्र अभिमानाच मंगळसूत्र. मी मराठ्यांच्या राजाची राणी आहे. अखंड सौभाग्यवती हो.” जिजाऊ साहेबांचा हा आशीर्वाद म्हणजे बाबासाहेबांच्या मुक्तशैलीचा अविष्कार आहे. जिजाऊ साहेब, महाराज आणि सोयराबाई यांच्या कौटुंबिक नातेसंबंधांवरचे भावनाविश्व् किती समर्पकपणे प्रेक्षकांसमोर मांडले आहे. ते साहित्याच्या दृष्टीने अत्यंत दर्जेदार आहे.

जाणता राजाच्या सुरवातीला महाराष्ट्राचे वर्णन करताना बाबासाहेबांचा मिश्कीलपणा प्रकट होतो. महाराष्ट्राचे वैभव वर्णन करताना ते लिहितात,” इथं घरांना कड्या कुलुप नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता, खरंच महाराष्ट्रात आजही एक गाव असे आहे जिथे खरंच घरांना कड्या कुलूप नाहीत. या वर्णनातून समृद्ध महाराष्ट्राचे वर्णन अगदी चपखल केलेलं दिसते.

शृंगार हा देखील साहित्याचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्राची लावणी सादर करताना काव्यबद्ध करताना बाबासाहेब लिहितात,”मी हो राया गोकुळची बासुरी.
मी साधीसुधी नाही
सात सुरांची घेऊन ओंजळ
शोधीत होते प्रीत

तृषार्त कोणी मिळेल का मज
करील निर्मल प्रीत
अवचित आल्या गोकुळातून श्वासांच्या फुंकरी
वेध घेत मी फुंकरीच्या त्या
गेले हरीच्या घरी
मी हो राया गोकुळची बासुरी
ही लावणी असामान्य आहे तिचा दर्जा त्यांनी त्यांच्या साहित्यातून खास पद्धतीने व्यक्त केला आहे.

अजून एक उदाहरण म्हणजे जाणता राजा या महानाट्यामधील औरंगजेबाचे शब्द,” कुछ भी हो वो है हमारा दुश्मन. लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है.
दुश्मन के भी मस्जिद और फकीर की भी इज्जत करता है वो.
कदाचित हे शब्द बाबासाहेबांनी संत साहित्याच्या अभ्यासातून उमगले नसतील…?
शिवरायांचे कैसे बोलणे
शिवरायांचे कैसे चालणे
शिवरायांची सलगी करणे कैसी असेल?

चौफेर वाचन, चिंतन, साधना, अभ्यास, संशोधन त्याबरोबर अंत:प्रेरणा यातून बाबासाहेबांच्या साहित्याचा जन्म झाला आहे.
मराठी भाषेचे वर्णन करताना बाबासाहेब म्हणतात, किती भरभरून लिहितात बघा.

”कुलवंत मराठी बोली, पैठणी ल्याली
लक्ष्मी सजली, माळीला शुभ्र कळी गजरा
सोळा शृंगार याली मथुरा
मराठी डौलदार नखरा
आपली मराठी भाषा कुलवंत आहे तिने पैठणी नेसली आहे. शुभ्र कळी गजरा माळला आहे. आणि हाच मराठी भाषेचा डौल आहे.

जाणता राजा या महानाट्याबाबत आणखी एक लेखन म्हणजे बाबासाहेबांचे मागणे सुद्धा किती उत्तुंग आहे. महाराजांच्या जीवनाच्या चरित्राच्या बाबतीत ते तुम्हा आम्हाला काय मागतात…तव शौर्याचा एक अंश दे
जीवनातील एकच क्षण दे.
तव तेजाचा एक किरण दे.
त्या दीप्तीतून दाही दिशा द्रुत
उजळून टाकू पुसू पानपत
पुन्हा लिहायला आमचे भारत
व्यास वाल्मिकी येतील धावत.

खरोखरी ही प्रतिभा व्यास वाल्मिकींसारखीच आहे. कल्पनांमध्ये आणि भूतकाळात रमणारे बाबासाहेब त्यांच्या या चिंतनातून एक भावपूर्ण प्रसंग उभा राहिला आहे. शिवाजी महारांच्या महानिर्वाण प्रसंगी त्यांच्या बाजूला बसलेल्या मावळ्यांमध्ये हिरोजी फर्जंद देखील होता. कदाचित एखाद्या बखरीमध्ये किंवा कागदपत्रांमध्ये तो प्रसंग नसेल पण बाबासाहेब तिथं पर्यंत कल्पनेद्वारे पोहोचतात. तो प्रसंग लिहिताना बाबासाहेब म्हणतात, हिरोजी म्हणाला असेल अश्रू आवारत आवारत, ”महाराज, आग्र्याहून सुटताना तुमच्या पलंगावर मी होतो. आणि तुम्ही निसटून गेलात. आज सुद्धा तुमच्या या शेवटच्या महानिर्वाणाच्या जागेवर मी बसतो तुम्ही बाहेर पाडा.” बाबासाहेबांचे हे विचार ही कल्पना सगळेच अद्वितीय आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा