पुणे : कोरोना संकट बर्‍याच अंशी ओसरले आहे. त्यामुळे तब्बल पावने दोन वर्षांनंतर शहरातील काही एक पडदा चित्रपटगृह सुरू झाली आहेत. मात्र प्रेक्षक उपलब्ध होत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी एक पडदा चित्रपटगृह चालकांना खेळ सुरू करण्याआधी अक्षरश: प्रेक्षकांची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे वळविण्यासाठी नवे चित्रपट प्रदर्शित होणे गरजेचे असल्याची अपेक्षा चित्रपटगृह चालकांनी शुक्रवारी व्यक्त केली.
बहुपडदा चित्रपटगृहाप्रमाणेच एक पडदा चित्रपटगृहेही शासनाच्या नियमानुसार 50 टक्के आसन क्षमतेने सुरू झाली आहेत. अद्यापही लोकांच्या मनात कोरोनाची भिती कायम आहे. त्यामुळे चित्रपटगृहात जावून चित्रपट पाहण्यास प्रेक्षक टाळाटाळ करत आहेत. म्हणूनच मोजक्या प्रेक्षकांसाठी चित्रपटगृह चालकांना खेळ सुरू करावा लागत आहे. बर्‍याच वेळा तर नुकसान सहन करून खेळ सुरू ठेवावा लागत आहे. काही वेळा, तर मोजक्या प्रेक्षकांमुळे खेळ सुरू करावा की नाही, अशी द्विविधा मनस्थिती निर्माण होत असल्याचा अनुभवन चित्रपटगृह चालक सांगत आहेत.
चित्रपटाच्या एका खेळासाठी जो खर्च येतो. तो खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे. केवळ प्रेक्षक आज ना उद्या चित्रपट पाहण्यासाठी येतील, या आशेवर चित्रपटगृह चालविले जात आहेत. बहुपडदा चित्रपटगृहांच्या स्पर्धेत एक पडदा चित्रपटगृह टिकवायचे असतील, तर शासनाने तातत्काळ 100 टक्के आसन क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे. अन्यथा जे मोजके एक पडदा चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. ते ही काही दिवसांत बंद पडतील. कारण एकीकडे 50 टक्के आसन क्षमतेची अट, तर दुसरीकडे प्रेक्षकांचा अभाव अशा स्थितीत दिवसेंदिवस एक पडदा चित्रपटगृहांवर आर्थिक संकट वाढत जाईल, असेही एक पडदा चित्रपटगृह चालक सांगत आहेत.
प्रेक्षकांचा अत्याल्प प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी चित्रपटगृह सुरू केले आहे. पहिले तीन दिवस प्रेक्षकांचा काही प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मात्र चौथ्या दिवशी काही खेळ रद्द करण्यासारखी परिस्थिती होती. नवीन चित्रपट नाहीत. 50 टक्के आसन क्षमतेने चित्रपटगृह चालवावे लागत आहेत. त्यामुळे एक पडदा चित्रपटगृहाची स्थिती तशी चिंताजनकच आहे. कदाचित नवीन चित्रपट उपलब्ध झाल्यास प्रेक्षकांची संख्या वाढू शकेल. जे काही एक पडदा चित्रपटगृह सुरू झाले आहेत. त्यांना प्रतिसाद मिळत नाही. – अशोक मोहोळ, मालक, वैभव चित्रपटगृह.
मोजक्याच प्रेक्षकांसाठी खेळ सुरू
दोन आठवड्यापासून चित्रपटगृह सुरू केले आहे. चित्रपट पाहण्यासाठी येणार्‍या प्रेक्षकांची संख्या मोजकीच आहे. सद्य:स्थितीत ‘बंटी और बबली’ या हिंदी चित्रपटाचे दोन खेळ आणि ‘अजिंक्य’ या मराठी चित्रपटाचे दोन खेळ सुरू आहेत. सध्याच्या परिस्थितीवरून चित्रपटगृहात येणार्‍या प्रेक्षकांसाठी वाट पहावी लागेल असेच चित्र आहे. 50 टक्के आसन क्षमतेने चित्रपटगृह सुरू आहे. – शरद फडके, व्यवस्थापक, अलका चित्रपटगृह.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा