पुणे : मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यामुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागला असता. भविष्यातील धोका लक्षात घेऊन शेतकर्‍यांनी एकजूटीने या कायद्याविरोधात लढा दिला. हा लढा मोंडून काढण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. त्यात काही शेतकर्‍यांना आपले जीव गमवावे लागले. मात्र शेवटी शेतकर्‍यांच्या एकीपुढे सत्ताशक्तीला झुकावे लागले. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
डॉ. आढाव म्हणाले, तीन कृषी कायदे शेतकर्‍यांशी अथवा तज्ज्ञांशी चर्चा न करता मनमानी पद्धतीने मंजूर करण्यात आले होते. त्याविरोधात शेतकरी बांधवांनी एकजूटीने लढा उभा केला. शेवटी शेकतकर्‍यांसारख्या मोठ्या गटाला सोडून देशाची प्रगती साधता येणार नाही, याची अनुभूती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आली असावी. म्हणून त्यांनी कृषी विधयेके मागे घेण्याचा निर्णय घेतला असावा. येत्या काळातही शेतकरी, कामगाराविषयी मनमानी पद्धतीने भूमिका घेऊ नये एवढीच अपेक्षा आहे. अन्यथा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केली आणि निवडणूका पार पडल्या की भूमिका बदलली असेही होता कामा नये. असेही डॉ. आढाव यांनी नमूद केले.
कृषी कायद्याप्रमाणेच मोदी सरकारला आर्थिक धोरणांविषयी फेरविचार करावा लागणार आहे. कारण सर्व घटकांना सोबत घेतल्याशिवाय देशालाही प्रगती पथावर वाटचाल करता येणार नाही. विशेषत: मोदी सरकारच्या काळात शेतकरी आणि कष्टकर्‍यांना दुर्लक्षित केले जात असल्याचे चित्र आहे. शेतकरी कायदे वर्षभरापूर्वीच मागे घेतले असते, तर अनेक शेतकर्‍यांचे प्राण वाचले असते. उशीरा का असेना मात्र शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारे कृषी कायदे मोदी सरकारने मागे घेतले. हा शेतकर्‍यांचा विजय असल्याचेही डॉ. आढाव यांनी स्पष्ट केले.
कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. मात्र हे कायदे कधी मागे घेणार? त्याबाबत शेतकर्‍यांशी चर्चा करणार का? हे कायदे रद्द करून दुसरे कोणते कायदे आणणार का? येत्या काळात एखादा कायदा आणताना सबंधित घटकांशी चर्चा करणार का? याबाबत सरकारकडून बोलले जात नसल्याने आता पुढे काय? हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे मोदीजींनी कायदे मागे घेण्याची जशी घोषणा केली आहे. तसेच त्याबाबतचे देशाला सविस्तर स्पष्टीकरण द्यावे. कारण येत्या काही महिन्यांत काही राज्यातील निवडणूका आहेत. एकदा निवडणूका पार पडल्यानंतर पुन्हा मोदी सरकारच भूमिका बदलणार नाही, याची शाश्वसती काय? असा प्रश्नही डॉ. बाबा आढाव यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा