पुणे : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील उद्योगजगत पूर्वपदावर आले आहे. जिल्ह्यातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त कामगारांचे लशीकरण पूर्ण झाले असून कोरोनापूर्व काळानुसार उद्योगांचे चलनवलन सुरू झाले आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर लावण्यात आलेल्या टाळेबंदीत सर्व व्यवहार बंदच होते. संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत केवळ 10 ते 15 टक्केच उद्योग सुरू होते. ज्या उद्योगांमधील कामगारांची राहण्याची व्यवस्था उद्योगाच्या आवारातच आहे, तेथील उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा चांगलाच फटका जिल्ह्यातील उद्योगाला बसला होता. सूक्ष्म, लघु उद्योग चांगलेच अडचणीत आले होते. यातून धडा घेत संभाव्य तिसर्‍या लाटेतही जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये कामगारांचे प्राधान्याने लशीकरण, कामगारांची उद्योगांच्या परिसरातच राहण्याची व्यवस्था आदींचा समावेश होता.

याबाबत बोलताना उद्योग पुणे विभागाचे सहसंचालक सुरवसे म्हणाले, दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर जून महिन्यापासून कोरोनाचे नियम पाळून उद्योग पुन्हा सुरू होण्यास सुरूवात झाली. या कालावधीत 70 ते 75 टक्के उद्योग सुरू झाले होते. 60 ते 65 टक्के कर्मचार्‍यांना उपस्थित राहण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र, दुसर्‍या बाजूला कामगारांचे लशीकरण करणे व्यवस्थापनाला बंधनकारक करण्यात आले. ऑगस्ट महिन्यापासून बाजारात मालाची मागणी वाढू लागल्याने कंपन्यांना उत्पादन वाढवण्यासाठी अधिकाधिक मनुष्यबळाचे लशीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील उद्योगजगत पूर्वपदावर आले असून 90 टक्क्यांपेक्षा जास्त कामगारांचे लशीकरण करण्यात आले आहे. ज्यांचे लशीकरण अद्यापही पूर्ण झालेले नाही, अशा कर्मचार्‍यांची दर 15 दिवसांनी करोना चाचणी करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात सहा लाखांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कामावर असणार्‍या कर्मचार्‍यांचे लशीकरण पूर्ण करण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष उत्पादनात कार्यरत असणार्‍यांना लसीकरणात विशेष गटात समाविष्ट करण्यात आले असल्याने या क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील उद्योगजगताचा आढावा

पुणे जिल्ह्यातील विविध उद्योगांची संख्या दोन लाख 34 हजार 677 असून साडेसोळा लाख कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड, इंदापूर, कुरकुंभ, चाकण, जेजुरी, बारामती, रांजणगाव, हिंजवडी आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. 450 मोठे माहिती तंत्रज्ञान युनिट असून नोंदणीकृत लहान आयटी युनिट 1400 आहेत. या क्षेत्रात साडेचार लाख कर्मचारी कार्यरत आहेत. पुण्यात विविध ठिकाणी 72 आयटी पार्क आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा