क्षितिजा देव

दिवाळी हा सणांचा राजा. सगळ्या धर्मीयांमध्ये हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. दिवाळी म्हणजे मुख्यतः दिव्यांचा, मांगल्याचा, आनंदाचा, प्रेमाची उधळण करण्याचा आणि मौजमजेचा सण. यंदा या वातावरणाला काहीशी चिंतेची, कोरोनामुळे गमावलेल्या काही गोष्टींची डूब आहे. तरीही एक नवी पहाट म्हणून या दिवाळीकडे पाहायला हवं.

आपल्याकडील लिखित पुराव्यांच्या उपलब्धतेनुसार शोध घेता लक्षात येतं की दिवाळीचा सण तीन हजार वर्षांपासून साजरा केला जात आहे. रामायणातल्या ग्रंथानुसार पुराणकाळात प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून सीतेला सोडवून आणलं आणि अयोध्यानगरीत प्रवेश केला तो दिवाळीचा पहिला दिवस. सगळ्या अयोध्यावासीयांचं प्रभू रामचंद्रांवर भरपूर प्रेम होतं. ते अत्यंत आतुरतेनं त्यांची वाट पाहत होते. त्यामुळे प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आल्यावर तिथल्या प्रजेनं त्यांचं अत्यंत थाटामाटात आणि दिव्य सोहळा करत स्वागत केलं.

मंगल वाद्यांच्या गजरात जागोजागी हजारो दिवे उजळलेले होते. कारण दिवा हे भारतीय संस्कृतीमध्ये मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. सर्व अयोध्यानगरी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली होती. सर्वत्र रांगोळ्या, फुलांची तोरणं, गायन-वादन-नृत्य, गोड-धोड पक्वान्नांची चंगळ असा त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ मोठा आनंदोत्सव चालला होता. त्या दिवसांची आठवण म्हणून दिवाळीचा सण साजरा करण्याची प्रथा पडली. दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. या शब्दाचा अर्थ दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ… दिव्यांची ओळ. या दिव्यांच्या ओळी आपल्याला घरीदारी, मंदिरात, मंगलतेचं तेज ऊजळताना दिसतात. दसर्‍यानंतर बरोबर 21 दिवसांनीच दिवाळी का येते याचं कारणही असं आहे की दसर्‍याला रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र परत यायला निघाले तेव्हा त्यांना अयोध्येत पोहचायला बरोबर एकवीस दिवस लागले होते.

दिवाळी हा आनंदाबरोबरच संस्कृती जोपासणारा सण मानला जातो. मुळात आपला देश संस्कृतीप्रिय. दिवाळीच्या वेगवेगळ्या दिवसांचं वेगळं महत्व आहे. त्यातून प्रेम आणि कृतज्ञताही व्यक्त केली जाते. पहिला दिवस वसुबारसाचा असतो. आपला देश शेतीप्रधान म्हणून ओळखला जातो. पुरातन काळापासून शेतकरी आणि शेत हा आपल्या देशाचा कणा मानला गेला, तसा तो आजही आहे. त्यामुळे गायीला आपल्याकडे देव मानलं आहे. तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि तिचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या दिवशी सर्व सुवासिनी गाय-वासराची पूजा करतात. कालमानानुसार सण साजरा करण्याच्या पद्धतीत बदल झाला असला तरी मूळ हेतू मात्र तोच आहे.

दिवाळीतला दुसरा दिवस नरक चतुर्दशीचा म्हणजे आळस झटकून टाकून पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याचा असतो. पुराणात अशी कथा आहे की या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि जनतेला त्याच्या जाचातून सोडवलं. तेव्हा जनतेनं आनंदाने फटाके उडवले. त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. शिवाय पहाटे लवकर उठणं हे आरोग्यासाठी हितकारक आहे या परंपरेला सर्वांची मान्यता आहेच.

त्यानंतरचा लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म झाला असं कथन आहे. माणसाच्या संसारात अतोनात महत्त्व असणार्‍या लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, संध्याकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळी मोठ्या थाटामाटात घरोघरी लक्ष्मीपूजन केलं जातं. ना ना प्रकारच्या मिठाया, फळफळावळं यांचा नैवेद्य दाखवला जातो. घरातलं सोनं-नाणं, पैसे, बँकेचं पासबुक यांची पूजा केली जाते. यांच्याबरोबरच प्रतिकात्मक रुपात, नवीन केरसुणीला आज अनन्यसाधारण महत्व असतं. कारण घरातला केरकचरा, सगळं अस्वच्छ, अमंगल घरातून दूर करण्याचं काम केरसुणी करते. म्हणून लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते. हे झालं घराघरातलं…. व्यापारीवर्ग आणि दुकानदार आपले आर्थिक व्यवहार सांभाळणार्‍या चोपडीला धनलक्ष्मी मानून पूजतात. सराफ कट्ट्यांवर दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची तोरणं पाहणं हा नयनरम्य देखावा असतो. पुढचा बलिप्रतिपदा किंवा पाडवा हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त समजला जातो. त्यामुळे या दिवसालाही विशेष महत्त्व दिलं जातं.

मंगल कार्याचा मुहूर्त, नवीन, चांगल्या गोष्टीची सुरुवात आणि मुख्यतः नवीन वस्तूंची खरेदी या दिवशी आवर्जून केली जाते. घरात देवाची पूजा, गोडाधोडाचा नैवेद्य, बळी राजाची पूजा याच्याबरोबरच खरेदीलाही महत्त्व असतं. हा पती-पत्नीच्या प्रेमाचा दिवस समजला जातो. त्यामुळे संध्याकाळी बायकोनं नवर्‍याला ओवाळलं की तिला खूष करण्यासाठी कोणती भेट द्यायची, याचा विचार अगोदरच करून पतीदेवांनी खरेदीही करून ठेवलेली असते. पुर्वीच्या काळी स्त्रियांना सोन्यानाण्याची भेट देणं हे स्त्रियांच्या सन्मानाचं मानलं जायचं. कारण स्त्रियांनाही सोन्याची अतोनात आवड होती. कालमानानुसार स्त्रियांच्या आवडी निवडीही बदलल्या आहेत. आज अर्थार्जनासाठी घराबाहेर पडणार्‍या स्त्रीला घरात आणि बाहेर अशा दोन्ही आघाड्यांवर श्रम करावे लागतात. सहाजिकच त्यामुळे घरातले श्रम कमी होतील, अशा सर्व सुविधा तिला मनापासून आवडतात. आयुष्य सुखकर होण्याच्या दृष्टीनं अशी अनेक नवी उपकरणं आता बाजारातही येत आहेत. हल्ली घराघरात रमणारी, दिलेल्या आज्ञा पाळणारी अलेक्सा अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली आहे. अशा नव्या धाटणीच्या सहाय्यकांनी अलिकडे घरकामातलं कुतुहलही वाढवलं आहे. अशीच एखादी भेट नवर्‍याने पाडव्याला दिली तर बायको एकदम खुष होऊन जाणं शक्य आहे…

दिवाळी आणि भेटवस्तूंचं जवळचं नातं आहे. भेट देण्यासाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खूप उपयुक्त ठरतात, असं हल्ली पहायला मिळतं. लॅपटॉप हा तर घरातल्या सगळ्या वयोगटातल्या खास सखा बनला आहे. ऑनलाइन चालणार्‍या शाळांच्या काळात तर ही लहान मुलांचीही गरज बनली आहे हे उघड दिसतं. तेच मोबाईलच्याही बाबतीत म्हणता येतं. हल्ली मोबाईल हा पोटच्या मुलाप्रमाणे सर्वांना प्रिय असतो. अधिकाधिक प्रगत होत असलेले मोबाईल आणि लॅपटॉप यांची भेट हल्ली नव्या पिढीला खूप भावते. नवीन वास्तू किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठीही पाडवा हा एक उत्तम मुहूर्त समजला जातो. त्यामुळे या दोन गोष्टींची खरेदी या दिवशी आवर्जुन केली जाते.

सध्या रिअल इस्टेटची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर खुलत आहे. दीड-दोन वर्षं थकलेली खरेदी पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावणारे सामान्यजन तयार घरांच्या आणि वाहनांच्या बाजारपेठेत नवे तरंग उमतवत आहेत. चालवण्यास सुखकर अशी नवनवीन वाहनं दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात आवर्जून दाखल होत असतात. अलीकडे वायूप्रदूषणाचा विचार करून केवळ बॅटरीवर चालणारी, प्रदूषणविरहित इलेक्ट्रीक वाहनं वेगाने लोकप्रिय होत आहेत. ही खरंच समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. या चैतन्यदायी वातावरणामुळे यंदाच्या दिवाळीला जबाबदारीचे, साजरीकरणाचे नवे संदर्भ जोदले जात आहेत.

घराघरांमध्ये सध्या ऐपतीप्रमाणे खरेदी मोहीम सुरु आहे. नुसत्या पाण्यावर लागणार्‍या तेलविरहित दिव्यांच्या पणत्या हीसुद्धा एक नवी आकर्षक वस्तू खरेदीसाठी आणि भेट देण्यासाठी उपलब्ध झाली आहे. अशा अनेक नवनवीन आकर्षक उपयुक्त छोट्या-मोठ्या भेटवस्तू दिवाळीत आवर्जून विक्रीस येतात. ते पहायलाही गंमत वाटते. पूर्वीच्या काळी अशी मजा नव्हती. केवळ सोनं, कापड आणि फार तर थोडं फर्निचर एवढीच खरेदी नव्याने व्हायची. हल्ली दिवाळी हा स्त्रियांच्या साज शृंगाराचा आणि पाककौशल्याचा आविष्कार दाखवण्याची संधी असलेला एक सुंदर सण ठरतो. त्यामुळे या प्रांतातही नवकल्पना आणि लक्षवेधी खरेदी भरारी घेताना दिसते. आजही स्त्रियांना पारंपरिक पद्धतीची नऊवारी साडी आणि त्यावरील दागिन्यांचा सगळा सरंजाम घालायला मनापासून आवडतं. पण पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे नऊवारी साडी नेसायला अवघड आणि वेळ खाणारी असते. मग त्यावरही कोणा एका चतुर शिंप्याने एक नामी उपाय शोधून काढला. शिवून तयार असलेल्या, नेसायला एकदम सोप्या अशा भरजरी नऊवारी साड्या बाजारात आणल्या. त्या महिलावर्गात लोकप्रिय झाल्या. त्यामुळे त्याची खरेदी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर होताना दिसते. अर्थात नऊवारी साडी म्हटली की त्यावर शोभतील असे दागिने घालणंही तिला आवडतं. ही स्त्रियांची आवड हेरूनच व्यापार्‍यांनी नवीन डिझाईनचे, सर्वांना परवडतील असे हरतर्‍हेचे, सर्व धातूंचे दागिने बाजारात आणले. त्याची खरेदी स्त्री वर्गाकडून मोठ्या हौसेने केली जाते. अर्थात ती करताना ट्रेंड आणि स्टाईल जपण्याची कालजी आलीच!

या हौसेबरोबरच स्त्रीच्या मनातली अन्नपूर्णा नेहमीच जागी असते. स्वतःच्या हातांनी नवनवीन पदार्थ करावेत आणि ते घरातल्या मंडळींना, प्रियजनांना प्रेमानं खाऊ घालावेत, ही ओढ स्त्रीला मनापासून असते. दिवाळीत ही हौस ती पुरेपूर भागवून घेते. यासाठी पूर्वीच्या काळी तरुणवर्गातल्या स्त्रियांना घरातल्या ज्येष्ठ स्त्रियांची मदत घ्यावी लागायची. पण आज युट्युबवर आणि टीव्हीवरील कार्यक्रमांमधून याबाबत चांगलं मार्गदर्शन मिळत असतं. असं असलं तरी आजच्या स्त्रीला दिवसातला सर्वच वेळ स्वयंपाकघरात घालवणं आवडत नाही. तिला आयुष्यातल्या सर्व गोष्टींचा आनंद घेण्याची आस असते. दिवाळीमध्ये घराबाहेर पडून घरच्या मंडळींबरोबर मौजमजा करणं, दिवाळीच्या पहाटे, चित्त प्रफुल्लित करणारे, नृत्य संगीताचे कार्यक्रम आवर्जून पाहणं ऐकणं आणि कलांचा आस्वाद घेणं तिला मनापासून आवडतं. त्यामुळे दिवाळीकाळात हल्ली विशेष उत्साह संचारताना दिसतो.

दिवाळीतला शेवटचा भाऊबीजेचा दिवस बहिण-भाऊ अत्यंत प्रेमाने आणि थाटामाटात साजरा करतात. पुरानानुसार, या दिवशी साक्षात यम आपली बहीण यमीकडे जेवायला गेला होता, अशी समजूत आहे. तात्पर्य असं की साक्षात यमाला सुद्धा बहिणीच्या भेटीची ओढ आवरता येत नाही… पूर्वीच्या काळी भाऊराया आपल्या लग्न झालेल्या बहिणीकडे परगावाहूनही आवर्जून साडीचोळी घेऊन भेटीला जात असे. एकूण दिवाळी म्हणजे गाठीभेटी घेण्याचा, उत्साहाचा, नवीन कार्याची जोमानं सुरुवात करण्याचा सण. दिवाळीकाळात बाजारात नुसती एक चक्कर टाकली तरी मन कसं प्रसन्न होतं… ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांनी केलेल्या दिव्यांचा झगमगाट, उत्साहानं खरेदी करणार्‍या गिर्‍हाईकांची लगबग, जागोजागी टांगलेले रंगीबेरंगी लहान-मोठे सुंदर आकाशदिवे, खाद्यपदार्थांचे दरवळणारे सुवास, फुलांची तोरणं, सजावट… नुसता जल्लोष चाललेला असतो. त्यातच आनंदाची गोष्ट म्हणजे कोरोनाचं सावट विरळ होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवाळी साजरी करायला उत्साह आला आहे. हा आनंद असाच पसरत राहो. शुभम भवतु.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा