पुणे : कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असताना पर्यटनस्थळे सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यातच थंडीची चाहूल आणि दिवाळीच्या सुट्ट्या याचे औचित्य साधून लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळलेल्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) त्यांच्या निवासस्थानांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.

मागील दीड ते दोन वर्षांचा कालावधी उलगडल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असून लॉकडाऊनमधील नियम शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या आदेशानुसार पर्यटन स्थळ देखील सुरू करण्यात आली आहेत. सध्या मान्सून परतला असून थंडीची चाहूल लागली आहे. आगामी हिवाळी हंगाम आणि दीपावलीच्या सुट्टीसाठी आतापासूनच नियोजन पर्यटकांनी सुरु केल्याचे दिसून येत आहे. दसरा व दिवाळीच्या सु्ट्ट्यांसाठी नोकरदार वर्ग व पर्यटन व्यावसायिक ही पर्यटनाचे नियोजन करीत आहेत. त्यासाठी पर्यटन विकास महामंडळानेही जय्यत तयारी सुरु केली आहे. याबाबात एमटीडीसी विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे म्हणाले, ‘पर्यटक केद्रस्थानी ठेवून नेहमीच सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे. यापुर्वी ज्या-त्या दिवसाचे आरक्षण करता येत नव्हते, मात्र आता पर्यटनासाठी घरातून बाहेर पडतानाही आरक्षण करता येणार आहे. महामंडळाची नुतनीकरण केलेली पर्यटक निवास आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तत्पर आहेत.’

ज्येष्ठ नागरिक, शासकिय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. आजी-माजी सैनिक व अपंगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येणार आहे, तर शालेय सहलींसाठी विशेष सवलती देण्यात येत आहेत. तसेच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळानेही पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्टची सुरवात नुकतीच केली आहे. तसेच महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच प्री-वेडींग फोटोशुट आणि डेस्टीनेशन वेडींगचीही सुविधा देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा