मोहन भागवत यांची खंत

नवी दिल्ली : ’वीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीने कधीही लोकांमध्ये त्यांची संस्कृती आणि देवाची उपासना करण्याची पद्धत यावरून भेद करण्याची शिकवण दिली नाही. ते कधीही मुस्लिमांचे शत्रू नव्हते किंवा मुस्लीमद्वेष्टेही नव्हते. असे असताना सावरकरांचा कायम द्वेषच करण्यात आला, अशी खंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेल्या ‘वीर सावरकर : द मॅन हू कॅन प्रिव्हेन्टेड पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ’सावरकरांबद्दल सत्य मांडले गेलेले नाही, त्यांचा फक्त द्वेष केला गेला. गांधीजींशी सावरकरांचे मतभेद होते, पण गांधीजींची प्रकृती बिघडली तेव्हा गांधीजींसारख्या महापुरुषाची गरज असून, प्रकृती सांभाळून गांधीजींनी आंदोलन करावे, असे सावरकर म्हणाले होते. रत्नागिरीमध्ये सावरकरांच्या अंधश्रद्धाविरोधी आणि अस्पृश्यतेविरोधी कामांची डॉ. आंबेडकरांनी प्रशंसा केली होती. सावरकरांवर अधिकाधिक संशोधन होऊन सत्य मांडले पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले.

गांधीजींच्या सांगण्यावरून दया अर्ज : सिंह

राजनाथ सिंह म्हणाले, सावरकरांनी ब्रिटिशांकडे केलेल्या दया अर्जावरून त्यांना बदनाम केले जाते. हे अर्ज गांधीजींच्या सांगण्यावरून सावरकरांनी केले होते. स्वातंत्र्याचा लढा शांततेने लढला जात असून, त्याच मार्गाने सावरकर या लढ़्यात सहभागी होतील, असे गांधीजींचे म्हणणे होते. राजनाथ यांच्या विधानावरून वादंग निर्माण झाला आहे.

आग्रह झाल्यावर दया अर्ज केला

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. सावरकरांनी त्या काळामध्ये अनेकांचे अर्ज तयार केले होते. पण स्वत: अर्ज केला नव्हता. त्यांना जेव्हा आग्रह झाला आणि सांगण्यात आले त्यावेळी त्यांनी दया अर्ज केला. त्यामुळे त्यांच्याबद्दल निर्माण केलेले वाद चुकीचे आहेत.

सावरकरांनी माफी मागितली नव्हती

शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले की, मोहन भागवत आणि संघाला सावरकरांविषयी प्रेम आले आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. सावरकर आमचे आदर्श आहत. राजकारण, तुरुंगवासात असताना काही वेळा रणनीती ठरवावी लागते. दहा वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात काढल्यानंतर बाहेर येऊन कार्य करावे असे वाटते. अशा परिस्थितीत जगभरात तुरुंगाबाहेर पडण्याचे जे मार्ग आहेत, तो मार्ग अवलंबला. म्हणून याचा अर्थ सावरकरांनी माफी मागितली असा होत नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा