मुख्य आरोपीला अटक; गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुले

पुणे : एकतर्फी प्रेमातून आठवीमध्ये शिकणार्‍या मुलीचा कोयत्याने तब्बल 44 वार करून खून करणार्‍या मुख्य आरोपीसह चौघांना बिबवेवाडी पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. बिबवेवाडीमधील यश लॉन्स परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती. मृत मुलगी कबड्डीच्या सरावाला गेलेली असताना हा धक्कादायक प्रकार घडला, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. शुभम उर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत (वय 22, मधुबन सोसायटी, कात्रज) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तो मूळचा सातारा जिल्ह्यातील लोहोमचा (ता. खंडाळा) रहिवासी आहे. त्याच्यासोबत 15, 16 आणि 17 वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. शुभम हा पिंपरी-चिंचवड येथील डी.वाय.पाटील महाविद्यालयाजवळ स्नॅक्स गाडी चालवतो. पोलिसांनी ताब्यात घेतलेली मुले त्याच्याकडे कामे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या घटनेची माहिती दिली. क्षितिजा आठवीमध्ये शिकत होती. ती कबड्डी खेळाडू होती. ती मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातील शुभम साथीदारांसह तेथे आला. क्षितिजाला बाजूला घेऊन सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर त्याने वार केला. यामुळे क्षितिजा खाली कोसळली; त्यानंतर त्याने क्षितिजाच्या गळ्यावर एकामागे एक असे 44 वार केले.पोलिसांनी आरोपींकडून दोन तलवारी, एक सुरा, एक कोयता, मिरची पावडर आणि बनावट पिस्तूल जप्त केले आहे.

घटनेच्या दोन दिवसांपूर्वी आरोपींनी या भागाची पाहणी केली होती. फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी येथे नागरिक येत असल्याचे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी कोणी विरोध केला तर त्यांच्या डोळ्यात टाकण्यासाठी मिरचीची पूड सोबत ठेवली होती. शुभम एका मित्रासह दुचाकीवरून आला. अन्य दोघे ओला कॅब करून पिंपरी-चिंचवडहून पुण्यात आले होते. कॅबमधून त्यांनी ही सर्व हत्यारे बॅगेत सोबत आणली होती, असे पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.
क्षितिजा कबड्डीचा सराव करत असताना आरोपी त्याठिकाणी आले. त्यांनी क्षितिजाला बाजूला बोलावले. त्यानंतर, थेट हत्याराने वार करण्यास सुरुवात केली. क्षितिजासोबत कबड्डीचा सराव करत असलेल्या मुलींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावर, एकाने सोबत आणलेले खोटे पिस्तूल रोखत त्यांना धाक दाखवला. त्यामुळे अन्य मुली घाबरल्या. आरोपीने क्षितिजावर सपासप असे 44 वार केले; त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपींच्या मागावर तातडीने पथक पाठवल्यामुळे 12 तासांतच सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले. क्षितिजावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्षितिजाच्या शाळेतील शिक्षक उपस्थित होते. घटनेबद्दल शिक्षकांनी दुःख व्यक्त केले. क्षितिजा अभ्यासात आणि खेळामध्ये अतिशय हुशार होती, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा