न्या. चपळगावकर यांचे प्रतिपादन

                पुणे : लोकमान्य टिळक बुध्दीप्रमाण्यवादी होते. येणार्‍या काळात दडलेले प्रश्न समजून घेण्याचा त्यांच्यात दृष्टेपणा होता. त्यांच्यातील दृष्टेपणा महात्मा गांधींनी ओळखला होता. गांधी आणि टिळक यांच्यात काही मतभेद होते. मात्र ते मतभेद मनभेदापर्यंत कधीच गेले नाहीत. मतभेद असले, तरी ते जाहीरपणे जाहीर न करण्याची प्रगल्भता दोघांतही होती. म्हणून ते लोकप्रिय नेते ठरले. त्यांचे नेतृत्त्व भारतीयांनी स्वीकारले. असे प्रतिपादन न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी गुरूवारी केले.

                केसरी-मराठा संस्थेच्या वतीने ‘केसरी’चे माजी विश्वस्त आणि संपादक साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्‍या केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक चपळगावकर यांच्या ‘लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी – नेतृत्वाची सांधेजोड’ या पुस्तकाला जाहीर झाला. काल केळकर यांच्या 74 व्या पुण्यतिथीदिन ऑनलाइन पद्धतीने पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यावेळी चपळगावकर बोलत होते. ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते. 

                चपळगावकर म्हणाले, ‘देश स्वातंत्र्यांच्या चळवळीत अनेक वेळा टिळक आणि गांधी यांच्यात विचारांची दरी निर्माण होणारे प्रसंग आले. मात्र त्यांचे त्यांनी कधीच संघर्षात रूपांतर होऊ दिले नाही. लोकमान्यांचा एखादा मुद्दा पडला नसला, तरी गांधीजींनी त्यावर कधीच उघडपणे भाष्य केले नाही. कारण टिळक आणि गांधी यांचे मार्ग वेगळे असले, तरी ध्येय मात्र एकच होते, याची जाणीव या नेत्यांना होती. त्यामुळेच गांधी आणि टिळकांच्या मनात एकमेकांच्या भूमिकाविषयी आदर होता. एकमेकांची मने जाणून घेण्याची प्रगल्भता त्यांच्यात होती. देशातील कामगार आणि कामगार संघटना लोकमान्यांच्या पाठिंशी होत्या, तर सर्वसामान्यांच्या मनात गांधीजींविषयी नितांत आदर होता. असेही चपळगावकर यांनी नमूद केले.

                लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्यात नेतृत्त्वाची स्पर्धा कधीच झाली नाही. दोघांच्याही स्वातंत्र्याविषयीच्या भूमिका नितळ आणि स्वच्छ होत्या. गांधीजींच्या चळवळी कधीच राजकीयदृष्ट्या नव्हत्या. त्यामुळेच ते लोकप्रिय होते. केळकरांनी साहित्यात विपुल लेखन केले. केळकर हे उदार होते. म्हणून केळकरांवर महाराष्ट्राने नितांत प्रेम केले. एका विषयावर विचार मांडण्याचा वस्तूपाठ केळकरांनी लिखाणातून दिला. त्या काळात टिळक आणि गांधी यांनी घेतलेल्या भलमिकांची तपासणी या पुस्तकात केली आहे. केळकरांच्या नावाने मला पुरस्कार मिळाल्याने कृतार्थ झाल्याची भावनाही न्यायमूर्ती चपळगावकरांनी यावेळी व्यक्त केली. ‘केसरी’चे सहसंपादक रामदास नेहूलकर यांनी चपळगावकर व त्यांच्या पुस्तकाची माहिती दिली. सहायक प्रा. वसुंधरा काशीकर यांनी प्रास्ताविक केले.

                लोकमान्यांचे द्रष्टेपण

                 लोकमान्य टिळकांना बहुतांश क्रांतीकारकांनी मदत केली. मात्र महात्मा गांधी हे क्रांतीकारकाच्या विरोधात होते. गांधी आणि टिळकांचे मार्ग वेगळे होते. मात्र ध्येय एकच होते. भारतीयांच्या मनात देशाभिमान जागृत करून लोकमान्यांनी स्वराज्याचा लढा उभा केला. तोच लढा चळवळींच्या रूपाने गांधींजीनी पुढे चालविला. असे प्रतिपादन ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांनी केले. केळकरांच्या लेखनीने साहित्याच्या वेगवेगळ्या प्रांतात मुक्त संचार केला. ते ‘केसरी’चे संपादक होते. टिळकांचे सहकारी होते. सुरत काँग्रेसमध्ये फाटाफुट झाली होती. लोकमान्यांनी काँग्रेसला पुन्हा जोडण्यासाठी पुढाकार घेतला. लखनौ करारातून हिंदू-मुस्लीम एकत्र आले. त्यांनी कामगार आणि संघटनांच्या भविष्याची काळजी घेतली. त्यातून लोकमान्यांना लोकप्रियता मिळत गेली. लोकमान्यांना मिळणार्‍या लोकप्रियतेमुळे बिटिश धास्तावले होते. लोकमान्यांनी शेतकरी, गिरणी कामगारासाठी चळवळ केली. त्यातून देशाला जागृत केले. सर्व लोकांना एकत्र आणले. लोकांना एकत्र आणल्याशिवाय स्वराज्याची मागणी पूर्ण होणार नसल्याचे त्यांनी जाणले होते. त्यातून लोकमान्यांचा दृष्टेपणा दिसून येतो. असेही डॉ. टिळक यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा