प्राप्तिकर विभागाला पवार यांनी सुनावले

मुंबई, (प्रतिनिधी) : केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा राजकीय कारणासाठी गैरवापर सुरू आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न फसल्याने आता या यंत्रणांना कामाला लावले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी भाजपवर टीकास्त्र सोडले. पाच दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांना त्यांनी, अजीर्ण होईल इतका पाहुणचार घेऊ नये, असा टोलाही लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडून बैठकीत आढावा घेतल्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना त्रास दिला जात आहे. ज्या पोलिस अधिकार्‍याच्या आरोपावरून अनिल देशमुख यांची चौकशी सुरू करण्यात आली; ते अधिकारी स्वतःच बेपत्ता आहेत. आरोपांमुळे देशमुख मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाजूला झाले, मात्र ज्यांनी आरोप केले ते कुठे गेले याचा पत्ताच नाही. सीबीआयने पाच वेळा देशमुख यांच्या घरावर छापा घातल्याबद्दलही पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.

फरार व्यक्ती साक्षीदार कशी?

प्रशासनाचा मलाही थोडा फार अनुभव आहे. अधिकार्‍यांकडून थोडी माहिती घेतली, तेव्हा केंद्राच्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षापेक्षा राज्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कितीतरी पट अधिक अमली पदार्थ जप्त केल्याचे कळले. वानखडे नावाचे कोणी अधिकारी आहेत, ते याआधी विमानतळावर कस्टमला होते. त्यांचे तिथलेही काही प्रताप ऐकायला मिळाले. तपास अधिकारी छापा टाकतात, तेव्हा शंकेला वाव राहू नये म्हणून त्रयस्थ पंचासमोर पंचनामा केला जातो. हे पंच विश्वासार्ह असावे लागतात. परंतु, गोसावी नावाचा कोणी तरी एका प्रकरणात फरारी असलेला यांना साक्षीदार म्हणून मिळाला. अशा व्यक्तींना पंच म्हणून बोलवणे म्हणजेच या अधिकार्‍यांचे कोणाबरोबर संबंध आहेत हेच स्पष्ट होते, अशी टीका पवार यांनी केली.

लखीमपूर येथील शेतकर्‍यांच्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद यशस्वी केल्याबद्दल पवार यांनी जनतेचे आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर मंत्रीपुत्राला अटक करावी लागली. परंतु, बघ्याची भूमिका घेणार्‍या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी पदावरून तत्काळ दूर झाले पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली. लखीमपूर घटनेची व मावळ गोळीबाराची तुलना करणार्‍यांनी मावळचा गोळीबार मंत्र्याने किंवा त्यांच्या मुलाने नव्हे, तर पोलिसांनी केला होता हे लक्षात घ्यावे, असे पवार म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा