मुंबई, (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली महाविद्यालये पुढच्या आठवड्यापासून पुन्हा गजबजणार आहेत. येत्या 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केली. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. ज्यांचे लशीकरण झालेले नाही; त्यांच्यासाठी विद्यापीठ, महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन लशीकरण मोहीम राबवावी; तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार आहेत. वसतिगृहेही टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शाळा सुरु झाल्या, मंदिरांची घंटा वाजली, नाट्य व चित्रपटगृहांचेही दरवाजे उघडण्याचा निर्णय झाला. मग महाविद्यालये का सुरू केली जात नाहीत? असा सवाल सतत केला जात होता. महाविद्यालये सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळात असलेले मतभेदही बाहेर येत होते. अखेर काल ही प्रतीक्षा संपली. 20 ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सामंत यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लशीकरण पूर्ण झालेले असले पाहिजे. वसतिगृहेदेखील टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

50 टक्के उपस्थिती; पण वाढ शक्य

महाविद्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत; पण स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने वर्ग चालवण्याबाबतचा निर्णय घेता येईल. ज्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहता येणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे. महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्यभरासाठी असला तरी काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण अजूनही अधिक आहे. तिथे परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासन निर्णय घेईल, असे सामंत यांनी सांगितले.

बिगर नेट, सेट अध्यापकांना निवृत्तिवेतन

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तिवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली. याचा 4 हजार 133 प्राध्यापकांना लाभ मिळणार आहे. जे अध्यापक 23 ऑक्टोबर 1992 ते 3 एप्रिल 2000 या कालावधीत नियुक्त होते; अशांना हे निवृत्तिवेतन मिळेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा