पुणे : जरंडेश्वर कारखाना घेतला, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. त्यांनी कारखान्याचा लिलाव केला आणि स्वतःच घेतला आहे. राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारचा पैसा जातो आणि त्याला अर्थमंत्रालय मान्यता देते. त्यामुळे या प्रकरणात उपमुख्यमंत्री पवार यांनी नियमांचे उल्लंघन केले असून, त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी पवार यांच्यावर तोफ डागली. तसेच, यश-व्ही-जेवेल्स या शेल कंपनीच्या माध्यमातून अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

सोमय्या म्हणाले, ‘जरंडेश्वर कारखान्याचे 27 हजारांहून अधिक सभासद असताना कारखाना अवसायनात जातोच कसा? त्यानंतर त्याचे खासगीकरण करून छुप्या पद्धतीने विक्री केली जाते. या प्रकरणात उच्च न्यायालयाने देखील कारखान्याच्या खरेदी व्यवहारात गैरव्यवहार व नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. या कागदपत्रांच्या आधारावर प्राप्तीकर विभागाने कारवाई सुरू केली. या कारवाईनंतर अनेकांनी मुद्दाम लक्ष्य केले जात असल्याचा कांगावा सुरू केला. वास्तविक, हा कारखाना घेणार्‍या संचालक विजया पाटील यांचे पती मोहन पाटील यांची कंपनी आहे. या कंपनीत नीता पाटील आणि अजित पवार यांचीदेखील भागीदारी आहे. कारखान्याचा मालक मुख्य भागधारक आहे. त्यात मोहन पाटील यांचे नाव आहे. दुसर्‍या नीता पाटील आहेत. हे लोक कोण आहेत? आता खरे व खोटे काय, हे शरद पवार यांनीच स्पष्ट करावे, असे आवाहन त्यांनी दिले.

नेटफ्लिक्सने वेबसिरीज बनवावी

राज्यातील नेत्यांचे कारखाने विक्रीचे असे गैरव्यवहार पाहता नेटफ्लिक्स कंपनीने एक वेबसिरीज बनवली, तर अजित पवार यांना कमीत कमी 200 ते 300 कोटी रॉयल्टी मिळू शकते, यातला सिझन 1 अजित पवार असतील, असा उपरोधक टोलादेखील सोमय्या यांनी लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा