पुणे : कोरोनामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. त्यातच डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणार्‍या 17 हजार बस आहेत. त्यामुळे एकीकडे घटती प्रवासी संख्या, तर दुसरीकडे डिझेल दरवाढ अशा दुहेरी संकटात एसटी सापडली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी 2021-22 च्या अंदाजपत्रकात एसटीसाठी 140 कोटीची तरतूद करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

एसटीचा डिझेलवर एकूण खर्चाच्या 34 टक्के इतका खर्च होता. वाढत्या डिझेल किंमतीमुळे तो आता 38 ते 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडत आहे. हा बोजा कमी करण्यासाठी परिवहन मंत्री परब यांनी डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ताफ्यातील 1 हजार गाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतर केले जाणार आहे. सीएनजी या पर्यायी इंधनावर धावणार्‍या गाड्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी आवश्यक निधीसाठी महामंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. 140 कोटी रूपयांची मागणी महामंडळाने केली होती. महामंडळाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पवार यांनी 2021-2022 च्या अंदाज पत्रकात या निधीची तरतूद केली आहे, असे परब यांनी सांगितले. त्यानुसार डिझेलवर धावणार्‍या एसटी बसचे सीएनजी वाहनांमध्ये रूपांतर करण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत.

एसटीच्या ताफ्यात लवकरच सीएनजी बरोबरच इलेक्ट्रीक, एलएनजी अशा पर्यावरणपुरक इंधनावर धावणार्‍या बस दाखल होणार आहेत. त्यामुळे भविष्यात इंधनावरील खर्चाच्या बचतीबरोबरच पर्यावरणपुरक प्रवासाला एसटी प्राधान्य देणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा