शारजा : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (आरसीबी) पुन्हा एकदा आयपीएलच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. शारजाच्या मैदानावर रंगलेल्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) आरसीबीला 4 गड्यांनी धूळ चारत स्पर्धेबाहेर ढकलले. यामुळे कर्णधार म्हणून आरसीबी चॅम्पियन बनण्याचे विराटचे स्वप्नही भंगले. कर्णधारपद सोडले असले तरी बंगळुरुसाठी शेवटपर्यंत खेळणार असल्याची इच्छा विराटने व्यक्त केली. आयपीएलमधील आरसीबीसाठी दिलेल्या

योगदानाबद्दल चाहत्यांनी विराटला धन्यवाद म्हटले. कर्णधार म्हणून संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्याचे विराटचे स्वप्न अपूर्ण राहिले. कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतरचे हे दु:ख विराटच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसू लागले होते. सामना संपल्यानंतर विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात तो इतर खेळाडूंशी संवाद साधत असताना चिडचिड करून ढसाढसा रडला. यावेळी एबी डिव्हिलियर्सलाही त्याचे अश्रू रोखता आले नाहीत.

विराट गेल्या 13 वर्षांपासून ही एक ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्रत्येक वेळी त्याला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. विराटच्या संघाने 3 वेळा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. पण प्रत्येक वेळी इतर संघाने आरसीबीला पराभूत करून ट्रॉफी मिळवली आहे.

सुनील नरिन फलंदाजी-गोलंदाजीमध्ये चमकला

या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चमकदार करणार्‍या सुनील नरिनने कोलकाताला विजय मिळवून दिला. नरिनने पहिल्यांचा गोलंदाजीत धमाकेदार कामगिरी केली. त्याने चार ओव्हरमध्ये फक्त 21 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. यामुळेच बंगळुरूला 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 138 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात कोलकाताने हे आव्हान गाठण्यात आपले 6 फलंदाज गमावले, पण शुबमन गिल आणि नरिन यांच्या आक्रमक फटकेबाजीमुळे त्यांना विजय मिळवता आला. या चमकदार कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

मॅक्सवेल भडकला

अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 मधील जबरदस्त प्रवास संपुष्टात आला. कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) शारजा येथे एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (आरसीबी) 4 गडी राखून पराभव केला. मॅक्सवेल या सामन्यात मोठी खेळी खेळू शकला नाही. गोलंदाजीत त्याने 25 दिल्या. दुसरीकडे, केकेआरच्या सुनील नरिनने गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल केली.

सामन्यानंतर, लोकांनी सोशल मीडियावर आरसीबी आणि त्याच्या खेळाडूंबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळलेल्या विराट कोहलीसाठीही अनेक शुभेच्छापर संदेश व्हायरल झाले. यासोबतच ट्विटरवर अनेक शब्दही ट्रेंड झाले.

सामन्याच्या काही तासांनंतर, मॅक्सवेलने त्यांच्या सर्थनाबद्दल चाहत्यांचे आभार मानले, परंतु अपमानास्पद ट्रोल्सवर देखील हल्ला चढवला. मॅक्सवेलने ट्विटरवर लिहिले, आरसीबीचा विलक्षण हंगाम, दुर्दैवाने, आम्ही जिथे असायला हवे होते त्यापासून थोडे दूर आहो. सोशल मीडियावर येणारे संदेश घृणास्पद आहे. आम्ही मानव आहोत जे दररोज आपले सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो गैरवर्तन पसरवण्याऐवजी, एक सभ्य चाहता बनण्याचा प्रयत्न करा. चांगल्या चाहत्यांचे आभार, ज्यांनी त्या खेळाडूंसाठी प्रेम आणि आपले सर्वस्व दिले. दुर्दैवाने तेथे काही वाईट लोक आहेत, जे सोशल मीडियाला एक भयानक ठिकाण बनवतात. हे अस्वीकार्य आहे. मॅक्सवेल पुढे म्हणाला, जर तुम्ही माझ्या टीममधील कोणत्याही मित्रावर सोशल मीडियावर अपमानास्पद टिप्पणी केली, तर तुम्हाला ब्लॉक केले जाईल. ग्लेन मॅक्सवेल आयपीएल 2021 मध्ये त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 15 सामन्यांमध्ये 42.75 च्या सरासरीने 513 धावा केल्या. त्याने संपूर्ण स्पर्धेत संघासाठी 16 षटके टाकली आणि 135 धावा देऊन 3 बळी घेतले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा