पुणे : नवरात्र आणि दसर्‍यामुळे ग्राहकांकडून झेंडूच्या फुलांना मागणी वाढत असते. यावेळीही फुलांना मोठी मागणी आहे. त्यामुळे दरात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. राज्यभरातून फुलांची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत पुरेसी असल्याने दरात मोठी वाढ झाली नाही. त्यात दीड वर्षांनंतर मंदिरे व धार्मिक स्थळे खुली झाली आहेत. त्यामुळे हेच दर काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज व्यापारी अरूण वीर यांनी बुधवारी व्यक्त केला.

                पुणे, सोलापूर, कोल्हापूर, हिंगोली, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांतून झेंडूच्या फुलांची आवक होत आहे. तर पुणे जिल्ह्यातील यवत, माळशिरस, राजेवाडी, पुरंदर भागातून शेवंतीच्या फुलांची आवक होत आहे. घाऊक बाजारात पिवळा आणि केशरी झेंडूला दर्जानुसार प्रतिकिलोला 40 ते 80 रूपये दर मिळत आहे. तर शेवंतीच्या फुलांना 90 ते 140 रूपये दर मिळत आहे. हा दर शेतकर्‍यांना परवडणारा असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

                मागील वर्षी याच दिवसांत शहरात लॉकडाऊन होता. तसेच मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात फुलांची लागवड केली नव्हती. परिणामी 20 ते 25 टक्केच आवक होत होती. मात्र यावेळी शेतकर्‍यांना दसर्‍यासाठी फुले राखून ठेवली होती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 75 ते 80 टक्क्यांनी फुलांची आवक वाढली आहे. मागील वर्षी आवक मर्यादित असल्याने या काळात झेंडूच्या फुलांना किलोला 100 ते 150 रूपये, तर शेवंतीच्या फुलाला 200 ते 250 रूपये दर मिळाला होता. मात्र यावेळी आवक चांगली आहे. तसेच मागणीही आहे. त्यामुळे ग्राहक तसेच शेतकर्‍यांना परवडतील असेच दर असल्याचेही अरूण वीर यांनी सांगितले.

परतीच्या पावसामुळे फुलांचे नुकसान

                नवरात्र आणि दसर्‍यामुळे अनेक शेतकर्‍यांनी फुले राखून ठेवली होती. मात्र परतीच्या पावसामुळे फुलांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. फुलांचे नुकसान झाले नसते, तर सद्य:स्थितीत बाजारात फुलांची विक्रमी आवक झाली असती. फुलांचे दरही घसरले असते. बाजारात विक्रीसाठी येणार्‍या झेंडूच्या फुलांत 20 ते 30 टक्के फुले भिजलेली आहेत. भिजलेल्या फुलांना दरही कमीच मिळत आहे. कोरड्या फुलांना अधिकचा दर मिळत असल्याचेही अरूण वीर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा