धबधब्यांपासून मिळणार ’शाश्वत ऊर्जा’

पुणे : जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक गावे आजही अंधारात आहेत. ज्या ठिकाणी वीज आहे, त्या ठिकाणी वीज पुरवठा नियमित होत नाही. कधी भारनियमन तर कधी पावसामुळे अचानक दोन-तीन दिवस खंडित होणारा वीजपुरवठा. भोर, वेल्हा तालुक्यातील दुर्गम भागात विजेचा लंपडाव पाचवीलाच पुजला आहे. मात्र, अशा दुर्गम भागांतील गावांना ऊर्जेबाबात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी काही ध्येयवेड्या तरुणांनी ’मिशन ऊर्जा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे वेल्हा, भोर तालुक्यांतील दुर्गम भागातील गावांना भेडसावणारी ही समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. ’स्वदेश चित्रपटापासून प्रेरित होत पावसाळ्यात धबधब्याचे पाणी साठवून त्यावरून वीजनिर्मिती केली जाणार आहे. कंपन्या, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी आणि गावकर्‍यांच्या सहभागातून सहा गावांमध्ये ’मिशन ऊर्जा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. याद्वारे पुढील पावसाळ्यात गावकर्‍यांना शाश्वत उर्जेचा प्रकाश मिळणार आहे. भोर, वेल्हा तालुक्यांतील 6 व सातारा जिल्ह्यातील 4 गावे येत्या वर्षात स्वतः तयार केलेल्या विजेने उजळून निघतील.

धबधब्याचे पाणी एका साठवण तलावात साठवून या पाण्यावर सात ते आठ महिने वीजनिर्मिती केली जाणार आहे. एका प्रकल्पातून वर्षभरात 16 ते 22 हजार किलोवॅट वीजनिर्मिती या प्रकल्पातून केली जाणार आहे. प्रकल्पाचा शास्त्रीय अभ्यास, तांत्रिक पाहणी पूर्ण झाले आहे. प्रशासकीय परवानगी देखील मिळाल्या आहेत. तज्ज्ञांच्या सहभागातून या महिन्यात कामाला सुरुवात होईल. वेल्हे तालुक्यातील घेवंडे, गेळगाणी, धोपेखिंड, तर चांदवणे या भोर तालुक्यातील गावात हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

वेल्हा तालुक्यातील घेवंडे गावामध्ये मिशन ऊर्जा या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर सरपाले, सर्व गावांतील सरपंच, लोकप्रतिनिधी, ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन, पर्सिस्टंट फाउंडेशन, किर्लोस्कर ब्रदर्स, इमरीस इंडिया, रोटरी क्लबचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नैसर्गिकदृष्ट्या आणि सह्याद्रीच्या डोंगररांगामुळे येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे पाणी वाहून जात धरणात मिसळते. याच पाण्याचा वापर करून, पुण्यात अभियंते असलेल्या तरुणांचा एक समूह ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून छोटा वीजप्रकल्प उभारणार आहेत. यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनी, पर्सिस्टंट फाउंडेशन, इमरीस इंडिया आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोने सहकार्य केले आहे.

ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष तन्वीर इनामदार म्हणाले, दुर्गम भागातील नागरिकांची सुरळीत वीज पुरवठ्याअभावी होणारी गैरसोय आम्ही पाहिली. स्वदेश चित्रपट आम्ही पाहिला होता. हाच धागा पडकत, आम्ही दुर्गम गावे विजेत स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला. ’मिशन ऊर्जा’ उपक्रमातून आम्ही गावकर्‍यांना त्यांच्या हक्काची आणि त्यांच्या गावात तयार होणारी वीज देणार आहोत. या उपक्रमासाठी काही गावकर्‍यांनी स्वतःची जमीन दिली आहे; तसेच देखभाल खर्चाची रक्कमही लोकसहभागातूनच उभी राहणार आहे.

गावात स्थापन करणार ऊर्जा समित्या

या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ही ग्रामस्थांना नाममात्र भावात वितरित केली जाणार आहे. 1 ते 1.30 रुपये घेतले जाणार आहे. महावितरणच्या दरापेक्षा हे दर कमी आहे. गावात ऊर्जा समित्या स्थापन करून, त्याद्वारे याचे नियोजन केले जाणार आहे.

पर्सिस्टंट फाउंडेशनचे वैभव निकम म्हणाले की, ’’पावसाळ्यातील चार महिन्यांत गावातच तयार होणारी वीज गावकर्‍यांना आठ ते दहा महिने पुरणार आहे. या प्रकल्पाच्या देखभालीसाठी गावात ऊर्जा समिती नेमणार आहोत. सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हीच मंडळी ऊर्जा व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी सांभाळतील. वर्षाला 16 हजार ते 22 हजार किलो वॅट ऊर्जानिर्मितीचे ध्येय ठेवले आहे.

असा असेल वीज प्रकल्प

डोंगर रागांतून धबधब्याच्या रुपात पडणारे पाणी बंधार्‍याच्या माध्यमातून पाइपाद्वारे 120 ते 160 क्युबिक वेगाने पाणी सोडून टर्बाईन चालवून वीजनिर्मिती होईल. गावातच याचे वीज केंद्र असणार आहे. तेथूनच प्रत्येक घरात वीज पोहचविण्याची व्यवस्था असेल. एका तासाला 5 किलोवॅट वीजनिर्मितीची क्षमता या प्रकल्पाची आहे. एका प्रकल्पाला 10 लाख खर्च असून, सामाजिक दायित्व निधीतून प्रकल्प पूर्ण केले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा