पुणे : पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणार्‍या चाकरमान्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या सोमवारपासून सिंहगड एक्सप्रेस धावणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 20 महिन्यांपासून बंद असल्याने चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली होती, मात्र आता ती  दूर होण्यास मदत होणार आहे.

                पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 6.5 वाजता सिंहगड एक्स्प्रेस मुंबईसाठी रवाना होईल. सकाळी 9.55 वाजता ही गाडी मुंबईत पोहचेल. पूर्वी ही गाडी मुंबईतून दुपारी 2.25 वाजता पुण्याकडे रवाना होत होती. मात्र आता ही गाडी दुपारच्या ऐवजी सायंकाळी 6.50 वाजता पुण्याकडे निघेल. पूर्वी या वेळेत सह्याद्री एक्स्प्रेस पुण्याकडे रवाना होत होती.

                कोरोनामुळे रेल्वेगाड्यांही प्रवासी वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्या होत्या. सिंहगड एक्स्प्रेस 22 मार्च 2020 रोजी प्रवासी वाहतूकीसाठी बंद करण्यात आली होती. मात्र सद्य:स्थितीत कोरोना नियंत्रणात आहे. पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन सिंहगड एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

देहूरस्ता, तळेगावला थांबा हवा

                दीर्घ कालावधीनंतर धावणार्‍या सिंहगड एक्स्प्रेसला शिवाजीनगर, खडकी, पिंपरी, लोणावळा, कर्जत, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबा देण्यात आला आहे. मात्र, लोकल बंद असल्याने देहूरस्ता आणि तळेगाव परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे देहूरस्ता आणि तळेगाव येथे या गाडीला थांबा देण्यात यावा. हिंजवडी, चांदणी चौक, बाणेर, पाषाण, बालेवाडी, चाकण, खेड परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी मुंबईला जातात. देहूरस्ता आणि तळेगाव येथे थांबा दिल्यास या प्रवाशांची गैरसोय दूर होईल.

हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी संघ.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा