पुणे : आठवीत शिकणार्‍या कबड्डीपटू मुलीवर नात्यातील एका युवकाने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना बिबवेवाडी येथील यश लॉन्सच्या परिसरात मंगळवारी घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसात शुभम उर्फ ऋषिकेश भागवत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे, तर इतर दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुलीवर शस्त्राने हल्ला झाला तेव्हा जवळच काही मुले कबड्डीचा सराव करत होते. तर, काही नागरिक चालण्याचा व्यायाम करत होते. मात्र, अचानक एका युवकाने वार करण्यास सुरूवात केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली. दरम्यान, हा सर्व प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

क्षितीजा अनंत व्यवहारे (वय १४ ) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. क्षितीजा आठवीमध्ये शिकत असून काल मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स येथे कबड्डीचा सराव करत होती. त्यावेळी नात्यातील एक युवक साथीदारांसह तेथे आला आणि त्याने क्षितीजाशी वाद घालण्यास सुरूवात केली. यानंतर त्याने सोबत आणलेला कोयता बाहेर काढला आणि तिच्या गळ्यावर वार केला. क्षितीजा खाली कोसळताच, त्याने सलग वार केले. त्यानंतर, आरोपींनी सोबत आणलेला कोयता तेथेच टाकला व घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी आरोपीने सोबत आणलेले पिस्तूलदेखील तेथेच टाकले. गुन्हा करताना त्याला पिस्तूल काढता आले नसल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. तसेच, गुन्हा घडण्याच्या काही वेळापूर्वीच त्या ठिकाणाहून पोलिसांची गाडी गेली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा