स्टॉकहोम : अमेरिकेच्या डेव्हिड कार्ड, जोशुआ अँग्रिस्ट आणि गिडो इम्बेन्स या तिघा अर्थशास्त्रज्ञांना 2021 या वर्षांतील अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. कामगार बाजारपेठेवर किमान वेतन, स्थलांतर, शिक्षण यांचा होणारा परिणाम यांच्या अभ्यासासाठी त्यांनी शास्त्रीय पद्धत शोधून काढली आहे. यासंबंधी सर्वसाधारण अभ्यास पद्धतीतून निष्कर्ष काढता येत असले तरी ते फारसे अचूक नसतात, त्यामुळे या तिघांनी शोधून काढलेली वैज्ञानिक पद्धत ही महत्त्वाची आहे.

कॅनडात जन्मलेले डेव्हिड कार्ड हे बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांना पारितोषिकाची निम्मी रक्कम मिळणार आहे, तर उर्वरित रक्कम मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूटचे जोशुआ अँग्रिस्ट, स्टॅनफर्ड विद्यापीठाचे जन्माने डच असलेले अर्थशास्त्रज्ञ गिडो इम्बेन्स (वय 58) यांना दिली जाणार आहे.
रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटले आहे की, तिघांनी अर्थ विज्ञानात मूर्त स्वरूपाचे काम केले आहे. कार्ड यांनी समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास केला. अँग्रीस्ट व इम्बेन्स यांनी परिपूर्ण स्रोतांच्या आधारे काही नैसर्गिक प्रयोग केले. या सर्वांच्या संशोधनातून काही प्रश्नांच्या कार्यकारणभावाचा उलगडा झाला असून त्यातून समाजाला मोठा फायदा होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा