लिमा/ पेरू : नेमबाजांनी अचूक वेध साधल्याने भारताने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत सर्वाधिक पदके मिळविली. महिलांमध्ये मनू भाकर हिने जबरदस्त कामगिरी करत 10 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. टोक्यो ऑलिंम्पिकमध्ये सुर गेलेल्या मनू भाकर हिने या स्पर्धेत पुन्हा पुनरागमन केले. मनूने 241.3 गुणांसह सुवर्ण तर इशा सिंगने 240 गुणांसह रौप्यपदक आणि तुर्कीच्या यास्मिन हिने 217 गुणांसह कांस्यपदक मिळविले.
तर 50 मीटरमध्ये शिखा नरवालने 530 गुणांसह अव्वल स्थान मिळवताना ‘सुवर्ण’ कामगिरी केली. ऐशा सिंहने (529 गुण) रौप्य, तर नवदीप कौरने (526 गुण) कांस्यपदक आपल्या नावे केले. दुसर्‍या स्थानावरील अमेरिकेने एकूण 21 पदके मिळवली. ‘आयएसएसएफ’ने जाहीर केलेल्या पदकतालिकेनुसार, भारताच्या खात्यात एकूण 40 पदके होती, ज्यात 16 सुवर्ण, 15 रौप्य आणि नऊ कांस्यपदकांचा समावेश होता. अखेरच्या दिवशी 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल आणि 50 मीटर पिस्तूल या ऑलिम्पिकमध्ये न खेळल्या जाणार्‍या नेमबाजी प्रकारांत भारतीयांनी उत्कृष्ट कामगिरी करताना सर्व 12 पदके आपल्या नावे केली.

25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात पुरुषांमध्ये विजयवीर सिद्धूने सुवर्ण, तर उधयवीर सिद्धूने रौप्यपदकाची कमाई केली. या जुळ्या भावंडांमध्ये अंतिम फेरीअखेरीस 570-570 अशी गुणांची बरोबरी होती. मात्र, विजयवीरने 10 गुणांवर सर्वाधिक (17 वेळा) वेध साधल्याने त्याने अव्वल क्रमांक पटकावला. या गटात हर्ष गुप्ताने (566 गुण) कांस्यपदक मिळवले. महिला गटात रिदम सांगवानने (573 गुण) सुवर्णपदकाची कमाई करताना निवेदिथा (565 गुण) आणि नाम्या कपूर (563 गुण) यांना मागे सोडले. तसेच 50 मीटर पिस्तूल नेमबाजी प्रकारात पुरुषांमध्ये अर्जुन सिंह चिमाने 549 गुणांसह सुवर्णपदक पटकावले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा