शारजा : कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज आयपीएलचा दुसरा बाद फेरीचा सामना सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी होणार तो संघ थेट अंतिम सामन्यात चेन्नईविरुद्ध दिसणार आहे. आजचा सामना जिंकण्यासाठी जबरदस्त चुरस दिल्ली आणि कोलकात्याच्या संघात दिसत आहे.

त्याआधी कोलकात्याने बंगळुरुला आयपीएलच्या बाहेर पराभूत करत केले. सुनील नरिनने (4/21 आणि 26 धावा) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमधील ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला चार गडी आणि दोन चेंडू राखून पराभूत केले. त्यामुळे कर्णधार म्हणून अखेरच्या ‘आयपीएल’ हंगामात बंगळूरुला विजेतेपद पटकावून देण्याचे विराट कोहलीचे स्वप्न अधुरेच राहिले.

बंगळूरुने दिलेले 139 धावांचे आव्हान कोलकाताने 19.4 षटकांत गाठले. शुभमन गिलने (29) फटकेबाज सुरूवात केल्यावर हर्षल पटेलने त्याला आणि त्याचा सलामीचा साथी वेंकटेश अय्यरला (26) माघारी पाठवले. तसेच यजुर्वेद्र चहलने राहुल त्रिपाठीला (6) पायचीत पकडत कोलकाताला अडचणीत टाकले. मात्र, नरिन (26) आणि नितीश राणा (23) यांनी महत्त्वपूर्व योगदान दिले. हे दोघे बाद झाल्यावर दिनेश कार्तिक (10), शाकिब अल हसन (नाबाद 9) आणि कर्णधार ईऑन मॉर्गन (नाबाद 5) या अनुभवी त्रिकुटाने कोलकाताला विजय मिळवून दिला. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी आज होणार्‍या ‘क्वालिफायर-2’च्या लढतीत कोलकातापुढे दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असेल.

तत्पूर्वी, शारजाच्या संथ खेळपट्टीवर बंगळूरुने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 138 अशी धावसंख्या उभारली. कोहली (39) आणि देवदत्त पडिक्कल (21) यांनी आक्रमक शैलीत फलंदाजी करताना पाच षटकांत 49 धावांची सलामी दिली. वेगवान गोलंदाज लॉकी फग्र्युसनने पडिक्कलला बाद करत ही जोडी फोडली. नरिनने कोहलीसह के.एस. भरत (9), एबी डिव्हिलियर्स (11) आणि ग्लेन मॅक्सवेल (15) या बंगळूरुच्या प्रमुख चौकडीला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यानंतर शाहबाझ अहमद (13) वगळता बेंगळूरुच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : 20 षटकांत 7 बाद 138 (विराट कोहली 39, देवदत्त पडिक्कल 21; सुनील नरिन 4/21, लॉकी फग्र्युसन 2/30) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : 19.4 षटकांत 6 बाद 139 (शुभमन गिल 29, सुनील नरिन 26; यजुर्वेद्र चहल 2/16)

सामनावीर : सुनील नरिन
4-0-21-4 सुनील नरिन 26(15 चेंडू)

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा