पुणे : पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्यात आणि वाढवण्यात ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांची महत्त्वाची भूमिका होती. आयुष्यभर त्यांनी गरजूंना मदत केली. लोकमान्यांचा निष्काम कर्मयोग त्यांनी आचरणात आणला, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांनी केले.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिष्ठानचे संस्थापक, तसेच विधान परिषदेचे माजी सभापती कै. जयंतराव टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त विशेष कार्यक्रम झाला. या समारंभात ते बोलत होते. पत्रकार भवनात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ संपादक अरविंद व्यं. गोखले प्रमुख पाहुणे होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, कार्यवाह गजेंद्र बडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर आणि सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे यावेळी उपस्थित होते.

डॉ. टिळक म्हणाले, दादा जाऊन १९ वर्षे झाली. त्यांचे जाणे माझ्यासाठी व ‘केसरी’साठी धक्कादायक होते. त्यामुळे आतापर्यंत त्यांच्यावर लिहिले; पण बोललो नाही. गोवा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, खासदार, आमदार, सभापती अशी विविध पदे भूषविली. निसर्गावर खूप प्रेम होते. लोकमान्यांचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला. त्यांना लहानपणी केसरीवाडा सोडून जावे लागले. ११ वर्षे आश्रितासारखे राहावे लागले, तरी त्यांच्या मनात कोणाबद्दल राग नव्हता.
राजकारण, समाजकारण, पत्रकारिता अशा विविध माध्यमांतून दादांनी लोकांची कामे केली. संघर्ष व अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी अनेक संस्था, संघटना उभ्या केल्या. अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ होते. त्या अर्थाने ते ‘संस्थानिक’ होते.

दादांनी हौसेतून सुरू केलेल्या ‘दी रोझ सोसायटी’ संस्थेतून पुणे सर्वाधिक गुलाबांची रोपे विकणारे शहर म्हणून देशात नावारूपास आले. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला. ऐतिहासिक वास्तू आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांच्या घरांवर नीलफलक ही संकल्पना दादांनी राबविली. राजकारणी, सभापती कसा असला पाहिजे, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबईतील सावरकर भवन, पुणे पत्रकार भवन या संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन गजेंद्र बडे यांनी केले. मंगेश कोळपकर यांनी आभार मानले.

अरविंद गोखले म्हणाले, शैली आणि भाषेतील प्रखरपणा जराही कमी होऊ न देता संपादकाने संपादकाच्या भाषेत कसे लिहिले पाहिजे आणि पत्रकारांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कसे लिहावे, याचे संस्कार जयंतराव टिळकांनी केले. त्यांच्यामुळे आम्ही लिहिते झालो. अमुक प्रसंगावेळी लोकमान्यांनी कसा विचार केला असता आणि त्यांनी काय लिहिले असते, याची जयंतराव नेहमी आठवण करून द्यायचे. त्यांनी संपादकांच्या शब्दाला महत्त्व आणि आकार देण्याचे काम केले. अनेक संस्था त्यांनी वाढवल्या. पुणे शहर घडवण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्तिसंग्राम लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांची मुलूख मैदानी तोफ अनुभवताना ते प्रति टिळक भासायचे. ते माणुसकी जपणारे वादळ होते. त्यांनी माणुसकीचा पोत हरवू दिला नाही, असेही त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांच्या भाषणात आक्रमकता होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांची भाषणे अत्यंत गाजली. मुलूख मैदान म्हणून ते परिचित होते. पुणे घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. संपादकाने लिहिलेल्या शब्दाला वजन देण्याचे काम दादांनी केले. त्यांनी आम्हाला घडवले. त्याचे ऋण कधीही फेडता येणार नाही, असे अरविंद व्यं. गोखले यांनी सांगितले.

पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि दादा

प्रा. डॉ. किरण ठाकूर
पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक, विश्वस्त कार्यवाह

पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि विधान परिषदेचे माजी सभापती कै. जयंतराव टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा निरोप समारंभ पत्रकार भवनात काल मंगळवारी आयोजित केला होता. दैनिक केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक आणि माजी संपादक अरविंद व्यं. गोखले यांनी जयंतराव टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांनी स्वागत केले आणि कार्यवाह गजेंद्र बडे यांनी आभार मानले. कै. जयंतराव टिळक यांचे पत्रकार संघ आणि प्रतिष्ठान यांच्यावर असलेल्या ऋणाबाबत प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त कार्यवाह प्रा. डॉ. किरण ठाकूर यांनी केलेले संस्मरण…

आम्हाला पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून जयंतराव टिळक लाभले हे आमचे भाग्य. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सर्वसाधारण सभेत प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा निर्णय झाला आणि या विश्वस्थ संस्थेचे नेतृत्व दादांनी करावे हेदेखील इतके स्वाभाविक होते की, कुठलीही, काहीही चर्चा न करता त्यांच्या अनुपस्थितीत निर्णय झाला. रामभाऊ जोशी आणि गोपाळराव पटवर्धन आणि आनंद आगाशे यांच्यासमवेत इतर विश्वस्तांची निवड झाली आणि मी विश्वस्त कार्यवाह म्हणून काम सुरू केले.

वास्तविक श्रमिक पत्रकार संघ म्हणजे कर्मचारी संघटना आणि जयंतराव दादा हे मालक पत्रकार. इतर क्षेत्रांमध्ये मालक आणि श्रमिक यांच्या संबंधात असतात तसे ताणतणाव आमच्या या क्षेत्रातही असायला हवे होते. परंतु मी 1974 पासून आतापर्यंत अनुभव घेतला आहे. या दोनही संस्थांमध्ये एकही ताण-तणावांचा प्रसंग आल्याचं मला आठवत नाही. दादा आणि केसरी- मराठा संस्था यांच्यामध्ये खूप जिव्हाळ्याचे नाते नेहमीच राहिले.

मला एक वेगळाच प्रसंग आठवतो. तो 1969-70 मध्ये पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात विद्यार्थी म्हणून मी प्रवेश घेतला तेव्हाचा. त्या वर्षी विभागाची प्रथमच ट्रिप होती. दिल्लीला जाणार होती. तिथे पोहोचल्यानंतर कळले की, संपूर्ण व्यवस्था दादांनी आपल्या स्वतःच्या निवासस्थानी केली होती. राज्यसभेचे सदस्य या नात्याने त्यांना मिळालेल्या निवासस्थानात त्यांनी ही व्यवस्था करून दिली होती. आम्ही तीस विद्यार्थी होतो. परंतु आमचा त्रास होतो किंवा अडचण होते, असे त्यांनी जाणवू दिले नाही. नंतर हळूहळू समजत गेले की, पत्रकारिता विभाग सुरू करण्यासाठी आणि नंतर सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केवढा हातभार लावला होता. विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीत स्वतः इंदुताई टिळक तर होत्याच; पण केसरीच्या संपादक विभागातील श्रीमती मृणालिनी ढवळे यांना देखील त्यांनी पाठविले होते. त्यानंतर काही वर्षांनी डॉ. दीपक टिळक यांनी विभागाच्या अभ्यासक्रमाला प्रतिष्ठा दिली.

विभाग प्रमुख म्हणून केसरीच्या संपादक विभागातील श्री. ल. ना. गोखले यांनी जबाबदारी स्वीकारण्यासाठी दादांनी प्रोत्साहन दिले. पुणे पत्रकार संघ 1940 मध्ये स्थापन झाला. तेव्हापासून संघाचे काम केसरीच्या कार्यालयात चालायचे. इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट (आय एफ डब्ल्यू जे चे) अध्यक्ष केसरीचे माधवराव साने झाले, तेव्हा आणि नंतर 1974 मध्ये या आमच्या फेडरेशनचे सतरावे वार्षिक अधिवेशन पुण्यात झाले. तेव्हा सर्व कामासाठी स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून जयंतराव यांनी मदत केली आणि आणि एकूणच भरघोस पाठिंबा दिला. या कार्यक्रमात सुद्धा रामभाऊ जोशी, य. वि. नामजोशी, आणि संपादक अरविंद व्यं. गोखले ही केसरीची जाणकार मंडळी आमच्या मदतीसाठी उभी होती. या काळातच दादांचा माझ्याशी आणि इंडियन एक्सप्रेसचे त्यावेळचे बातमीदार प्रकाश कर्दळे यांच्याशी संबंध आला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ असे नामकरण झालेल्या या संघटनेचे शिस्तीत काम चालू राहिले. त्यानंतर त्यातून पुणे पत्रकार प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था उभी राहिली. या सगळ्या कामासाठी दादांचा पाठिंबा खूप मोलाचा ठरला. प्रतिष्ठानचे काम 1991 मध्ये सुरू झाले तेव्हा तर एवढा मोठा प्रकल्प उभा करण्यासाठी मुख्यत: निधी उभा करण्यासाठी आम्हाला दादांची खूप मदत झाली.

महाराष्ट्र शासनाच्या त्या त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांची आणि अन्य नेत्यांची आम्हाला जेथे-जेथे मदत लागली तेथे दादांच्या नुसत्या नावाचासुद्धा उपयोग झाला. सार्वजनिक हितासाठी हा प्रकल्प उभारत आहोत हे आम्ही सांगत असू. त्याचा उपयोग झाला. महाराष्ट्र शासनातील मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रशासक या सर्वांवर दादांचा एक नैतिक धाक असायचा. त्याचा आम्हाला निश्चित फायदा झाला. आमची संघटना पत्रकारांची असल्यामुळे सगळ्या गोष्टी सहज सोप्या असतील असे मानू नका, हे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वागण्याच्या पद्धतीमुळे आमच्यावर बिंबवले होते.

अनेक वेळा त्यांच्या बरोबर मी पुण्यातल्या उद्योगपती आणि अन्य धनिक यांना देणग्यासाठी भेटायला गेलो. त्या प्रत्येक वेळी ते गमतीने म्हणायचे ‘चला आपल्याला भीक घ्यायला जायचे आहे’ राजकीय आणि पत्रकारितेतील स्थानाचा गैरफायदा थोडादेखील न घेता आम्हाला मदत हवी आहे. सार्वजनिक कामासाठी याचकाची भूमिकाच आपण ठेवली पाहिजे हे त्यांनी आम्हाला चांगलेच बिंबवले होते.

गुलाब पुष्प प्रदर्शनातून कै. जयंतराव टिळक यांना आदरांजली

टिमवित प्रदर्शनाला सुरुवात; डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : लोकमान्य टिळक यांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथात कर्मयोगाचा सिद्धांत मांडला. त्याच कर्मयोगाला अनुसरून कै. जयंतराव टिळक यांनी विविध क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केली. विविध संस्थांची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या रोझ सोसायटीची चळवळ पुढील पिढीने अविरत सुरू ठेवली आहे. गुलाब पुष्प प्रदर्शनाच्या माध्यमातून निसर्गप्रेमींना जो आनंद दिला जातो, तीच खरी कै. जयंतराव टिळक यांना आदरांजली ठरेल, असे गौरवोद्गार पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले.

कै. जयंतराव टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारोपानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, टिळक स्मारक मंदिर आणि पुणे रोझ सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणातील कै. जयंतराव टिळक विशेष गुलाब पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शिसवे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक होते. यावेळी टिळक विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक, प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणती टिळक, रोझ सोसायटीचे माजी अध्यक्ष अरूण पाटील उपस्थित होते. आज (बुधवारी) सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत हे पुष्प प्रदर्शन प्रेक्षकांसाठी खुले राहणार आहे.

डॉ. शिसवे म्हणाले, ‘कोणत्याही क्षेत्रात विविध मार्गांनी पैसे कमावण्याची संधी असते. परंतु, तत्त्वाला अनुसरून जो वाटचाल करतो त्याचे अविरत स्मरण केले जाते. राजकीय, सामाजिक, संस्थात्मक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रात तत्त्वनिष्ठ राहून कै. जयंतराव टिळकांनी प्रदीर्घ सेवा केली. विविध क्षेत्रात काम करताना ही तत्त्वे टिकविण्यासाठी खूप आत्मबल आणि जिद्द लागते. त्याहीपेक्षा आपल्या वाडवडिलांच्या तत्त्वांना धक्का बसणार नाही, म्हणून पुढील पिढीनेदेखील त्याच तत्त्वांचे पालन करून जीवनप्रवास करणे हे अत्यंत कठीण असते.

अनेक संस्थांने खालसा झाली, तरी पुण्यातील एक संस्थान कायम जिवंत राहिले, ते म्हणजे जयंतराव टिळक संस्थान! असे शब्द विठ्ठलराव गाडगीळ यांनी काढले होते. त्याची डॉ. शिसवे यांनी आठवण करून दिली. विविध क्षेत्रात काम करताना चांगले, वाईट अनुभव येत असतात. मात्र, तत्त्वनिष्ठेने अविरत काम सुरू ठेवल्यास जीवनातील प्रवास सुखकर होतो, असे सांगत डॉ. शिसवे यांनी जीवनात घडलेल्या रंजक क्षणांना उजाळा देत पूर्वजांकडून आलेल्या वारशाची शिकवण घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आवर्जून सांगितले.यावेळी टिमविचे प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजीत जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

अद्वितीय निसर्गप्रेमी

डॉ. दीपक टिळक म्हणाले, ‘दादांनी राजकीय सेवेत प्रदीर्घ ३२ वर्षे सेवा करताना पाच वर्ष विधानसभा आमदार, बारा वर्ष राज्यसभा सभासद, दीड वर्ष महाराष्ट्रात मंत्री आणि त्यानंतर 16 वर्ष विधान परिषद सभापती अशी अनेक पदे भूषवली. वाचनाबरोबरच त्यांना निसर्ग, प्राणी, पक्षी यांची देखील खूप आवड होती. केवळ आवड नसून भटकंती करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, वनविहार करताना कोणती शस्त्रे बाळगावी याचे अचूक ज्ञान त्यांना होते. त्यावर माहिती एकत्रित करून त्यांनी पुस्तके लिहिली. अखेरच्या क्षणापर्यंत तत्त्वनिष्ठा सांभाळली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा