दुबई : टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेत भारत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना हा 24 ऑक्टोबरला होणार आहे. हा विश्वचषकातील भारताचा पहिलाच सामना असणार आहे. पण तत्पूर्वी विश्वचषकातील भारताच्या सराव सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. जुन्या वेळापत्रकानुसार, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ 18 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार होता. त्यानंतर तो 20 ऑक्टोबर रोजी दुपारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार होता.

आता नवीन वेळापत्रकानुसार, भारतीय संघ आता 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता (भारतीय वेळेनुसार) ऑस्ट्रेलिया विरुद्ध सराव सामना खेळेल. दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर हा सामना होईल, भारतीय क्रिकेट संघाचा दुसरा सराव सामना 20 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. आधीच्या वेळापत्रकानुसार दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम भारताच्या दोन्ही सराव सामन्यांचे आयोजन करण्यासाठी तयार होते.

मात्र, आता सामने दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर होणार आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेट संघ आता आपला पहिला सराव सामना पाकिस्तानविरुद्ध 18 ऑक्टोबर रोजी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियम नर्सरी 1 मध्ये खेळणार आहे. त्यांचा दुसरा सराव सामना 20 ऑक्टोबर रोजी अबुधाबीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होईल.

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीत आठ पात्रता संघ सहभागी होतील. यातील चार संघ सुपर 12 फेरीत पोहोचतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. 2016 नंतरचा हा पहिला टी-20 विश्वचषक असेल.

गेल्या वेळी वेस्ट इंडिजने इंग्लंडला हरवून विजेतेपद पटकावले होते. भारताने सुपर-10 च्या गट सामन्यात पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. उपांत्य फेरीत भारताला विंडीजच्या हातून 7 बळीने पराभवाला सामोरे जावे लागले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा