मुंबई, (प्रतिनिधी) : कोरोनाची स्थिती नियंत्रणात आल्याने शाळा आणि प्रार्थनास्थळांपाठोपाठ गेली दीड वर्षे बंद असलेल्या नाट्यगृहे व चित्रपटगृहांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. येत्या 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांवरील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्याच महिन्यात आरोग्याचे नियम पाळून 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांनी काल याबाबतची नियमावली जाहीर करून गेल्या वर्षी मार्च महिन्यात बंद झालेले चित्रपट व नाट्यगृहाचे दरवाजे उघडण्याचा मार्ग मोकळा केला. चित्रपट, नाट्यगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर राज्य सरकारच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. तसेच, प्रतिबंधित क्षेत्रातील चित्रपटगृहे बंद राहतील. 22 ऑक्टोबरपासून बंदिस्त, खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार आहेत. त्यामुळे यंदा दिवाळी पहाट आणि पाडवा पहाटसारखे कार्यक्रम होऊ शकणार आहेत. बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकांमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान 6 फूट) आवश्यक राहील.

  • चित्रपटगृहांसाठी काय आहे नियमावली?
  • प्रेक्षकांचे कोरोना प्रतिबंधक लशीकरण झालेले असणे आवश्यक
  • चित्रपट पाहण्यास येणार्‍या प्रेक्षकांना मास्क बंधनकारक
  • चित्रपटगृहांमध्ये काम करणारे, तसेच खाद्य पदार्थांचे स्टॉल्स आदींवरील कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे लशीकरण आवश्यक.
  • चित्रपटगृहांमध्ये आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी, स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था आवश्यक
  • प्रेक्षकांचे थर्मल चेकअप आवश्यक
  • चित्रपटगृहे 50 टक्के आसन क्षमतेने सुरु करता येतील
  • दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवण्यात यावे. ज्या ठिकाणी प्रेक्षक बसणार नाहीत त्या खुर्चीवर क्रॉस मार्किंग करणे आवश्यक
  • तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये, यासाठी डिजिटल पध्दतीने तिकीट बुकींगवर भर देण्यात यावा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा