पाकिस्तानच्या मंत्र्यांचा अजब सल्ला; नागरिकांंमध्ये संताप

इस्लामाबाद : सध्या पाकिस्तानातील जनता महागाईमुळे त्रस्त आहे. त्यामुळे सरकारला जनतेचा रोष पत्करावा लागत आहे. यातच एका मंत्र्याने नागरिकांना अजब सल्ला दिला. वाढती महागाई रोखण्याऐवजी नागरिकांना, महागाई वाढत असल्याने अन्न कमी खा, असा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानात वाढती महागाई सामान्य लोकांसाठी तसेच सरकारसाठी अडचणीचे कारण बनली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे; पण सरकार जखमेवर मलम लावण्याऐवजी त्यावर मीठ चोळण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे फेडरल मंत्री अमीन गंदापूर यांनी अलीकडेच महागाई संदर्भात असे संतापजनक विधान केले, ज्यामुळे लोकांचा संताप झाला असून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

पाकिस्तानी माध्यमाच्या बातमीनुसार, पाकिस्तान सरकारमधील गिलगित-बाल्टिस्तान व्यवहार मंत्री अमीन गंदापूर यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना लोकांना कमी खाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, आपण देशासाठी इतका त्याग करू शकत नाही का? मी चहामध्ये 100 दाणे साखर घातली आणि 9 दाणे कमी घातले तर चहा कमी गोड होईल का? मी भाकरीचे 100 तुकडे खात असेन आणि त्यातील 9 तुकडे मी कमी खाऊ शकत नाही का? मंत्री म्हणाले की, जर 9 टक्के महागाई असेल तर मी माझ्या समाजासाठी, माझ्या मुलांसाठी इतका त्याग करू शकत नाही का? मंत्री महोदयांचे हा अजब सल्ला समाज माध्यमावर चर्चेचा विषय बनला आहे आणि लोक त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा