मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच महाविद्यालये होणार सुरू : उदय सामंत

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र मंगळवारी शहरातील काही काही महाविद्यालयांचा अपवाद वगळता बहुतांश सर्व महाविद्यालये बंद असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच महाविद्यालये सुरू होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे आता सुरू होणारी ही महाविद्यालये पुन्हा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाविद्यालये सुरू करण्याबाबत राज्याच्या उच्च शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अद्याप महाविद्यालयांना कोणतीही लेखी सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे पुण्यातील महाविद्यालयांकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. शासनाकडून लेखी आदेश प्रसिध्द केल्यानंतरच महाविद्यालये सुरू होतील, असे विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात आहे.

आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. बुचडे म्हणाले, महाविद्यालय सुरू करण्याबाबत तयारी सुरू आहे. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे प्रमाणपत्र जमा करून घेतली जात आहेत. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत. शासन व विद्यापीठाकडून कोणत्याही सूचना प्राप्त न झाल्यामुळे प्राचार्यांमध्ये महाविद्यालये सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. तसेच 18 वर्षे वयोमर्यादा असणार्‍यांसाठी उशिरा लस उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असून, त्यांची माहिती संकलीत केली जात आहे, अशी माहिती प्राचार्य महासंघाचे सचिव डॉ. सुधाकर जाधवर यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भूमिका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालये काही निर्बंधासह सुरू करण्यास परवानगी जाहीर झालेली आहेे. विद्यार्थ्यांच्या व शिक्षक-कर्मचार्‍यांच्या लशीकरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येत असून महाविद्यालये पूर्वतयारी करीत आहेत. अहमदनगर, नाशिक तसेच पुणे ग्रामीण क्षेत्रातदेखील परवानगीबाबत संबधित सक्षम प्राधिकरणाशी चर्चा सुरू असून वसतीगृहाबाबत देखील पूर्वतयारी सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा