पुणे : शहरातील एचसीएमटीआर (उच्च क्षमता द्रुतगती मार्ग) प्रकल्पाच्या मार्गिकेमध्ये तीन ठिकाणी बदल करण्याचा प्रस्ताव मंगळवारी मुख्य सभेत मान्य करण्यात आला. यासाठी दररोज एकमेकांवर टीका करणारे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस, मनसे आणि शिवसेना यांनी मात्र या बदलाला विरोध केला.

पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये 24 मीटरचा एचसीएमटीआर प्रस्तावित आहे. याला मुख्य सभेने मान्यता दिली. या प्रस्तावावर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सुनावणी व अभिप्रायानुसार कोथरुड, कर्वेनगर, वडगावशेरी आणि लोहगाव येथे बदल करण्याबाबत मुख्यसभेसमोर प्रस्ताव ठेवला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी खास सभेची मागणी केली होती. काल झालेल्या खास सभेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाल्याचे पाहायला मिळाले.

या प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड आणि आदित्य माळवे यांनी गांधीभवन ते अलंकार पोलिस चौकी या मार्गिकेत बदल करू नये अशी उपसूचना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल टिंगरे, प्रशांत जगताप आणि दत्तात्रय धनकवडे यांनी हा रस्ता लोहगाव विमानतळापर्यंत वाढविण्याची उपसूचना केली. नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनीही स्वारगेट येथील मार्गिकेमध्ये बदल करण्याची उपसूचना दिली. तीनही उपसूचनांसह प्रस्ताव खास सभेत मान्य करण्यात आला. या विषयावर सभेत वादळी चर्चा झाली. मनसेचे गटनेते वसंत मोरे व काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी या विषयाची संपुर्ण माहिती देण्याची मागणी केली. मात्र उपसूचना व मुख्यविषय मान्य झाल्यानंतरच सभागृहात माहिती देण्यात आली. बागूल म्हणाले, ठराविक बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी मार्गामध्ये बदल करण्यात येत आहेत. यामुळे पावणेदोन लाख चौरस फूट क्षेत्र हे निवासी करण्यात आले आहे. त्यामुळे यास आमचा विरोध आहे. वसंत मोरे यांनी वारंवार सभागृहात अगोदर माहिती देण्याची मागणी केली. मात्र शेवटपर्यंत माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे चिडलेल्या मोरे यांनी सभागृहातच कार्यपत्रिका फाडली.

उपसूचनेवर मतदान पुकारण्यात आल्यानंतर भाजप व राष्ट्रवादी एकत्र झाली. त्यामुळे 78 विरुध्द 16 मतांनी प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादी आणि भाजप यांचा शपथविधी कधी झाला, अशी विचारणा मनसेकडून करण्यात आली.

फायद्याच्या प्रस्तावासाठी युती!

महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे राष्ट्रवादीकडून भाजपच्या कारभारावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले जात आहे. कोथरुडची नेतेमंडळी राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत आहे. असे असताना फायद्याचे विषय आल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येवून एचसीएमटीआर प्रकल्पाच्या मार्गिकेमध्ये तीन ठिकाणी बदल करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा