पुणे : पुणे केंद्राकडून आणि कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून (सीएसआर) मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या लशी आणि राज्य शासनाकडून लशीकरणातून सुटलेल्या घटकांसाठी ‘मिशन कवच कुंडल’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात लशीकरणाचा वेग वाढला आहे. चालू महिन्यात पहिल्या दहा दिवसांतच सहा लाख जणांना लशीची पहिली किंवा दुसरी मात्रा देण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरासह जिल्ह्यात दर महिन्यात गेल्या महिन्यापेक्षा जास्त लशीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यात मे महिन्याचा अपवाद वगळता प्रत्येक पुढील महिन्यात आधीपेक्षा जास्त लशीकरण करण्यात आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात 16 जानेवारीपासून लशीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना, तर दुसर्‍या टप्प्यात इतर विभागांमधील आघाडीच्या कर्मचार्‍यांचे लशीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपुढील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लशीकरण करण्यास सुरुवात झाली, तर 1 मेपासून 18 ते 44 वयोगटाचेही लशीकरण सुरू करण्यात आले. लशीकरणासाठी शहरासह जिल्ह्यात 85 लाख 39 हजार 706 अपेक्षित लाभार्थी आहेत. त्यापैकी आरोग्य कर्मचारी एक लाख 98 हजार 319, इतर विभागांमधील आघाडीचे कर्मचारी दोन लाख 84 हजार 377, ज्येष्ठ नागरिक (60 वर्षांवरील) 13 लाख 322, 45 ते 59 वयोगटातील 19 लाख 30 हजार 614, तर 18 ते 44 या वयोगटातील 42 लाख 26 हजार 74 नागरिकांचा समावेश आहे.

दरम्यान, आतापर्यंत पहिली मात्रा 88 टक्के, तर दुसरी मात्रा 49 टक्के जणांना देण्यात आली. त्यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात पहिली मात्रा 103 टक्के, तर दुसरी मात्रा 53 टक्के जणांना देण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये पहिली मात्रा 77 टक्के आणि दुसरी मात्रा 52 टक्के जणांना दिली आहे, तर ग्रामीण भागात पहिली मात्रा 81 टक्के आणि दुसरी मात्रा 45 टक्के नागरिकांना देण्यात आली आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा