पुणे : शहरातील 15 पैकी कोथरूड-बावधन, औंध-बाणेर, हडपसर-मुंढवा, नगररस्ता-वडगावशेरी आणि सिंहगड रस्ता या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत अधिक सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, या पाच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सर्वाधिक 3.20 टक्के बाधित दर सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहे. दरम्यान, संबंधित पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत जास्त लक्ष देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

विभागीय आयुक्तालयाकडून ग्रामीण भागासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील कोरोना सद्य:स्थितीचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येतो. त्यामध्ये दोन्ही शहरांमधील पाच क्षेत्रीय कार्यालयांचे परिसर आणि ग्रामीण भागातील पाच तालुक्यांमध्ये अधिक सक्रिय रुग्णसंख्या आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी रुग्णालय, तालेरा रुग्णालय, थेरगाव रुग्णालय, जिजामाता रुग्णालय आणि यमुनानगर रुग्णालय विभागात अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 4.64 टक्के बाधित दर जिजामाता रुग्णालय विभागात आहे. तसेच ग्रामीण भागात जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली आणि बारामती तालुक्यांमध्ये अधिक सक्रिय रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक पाच टक्के बाधित दर जुन्नरमध्ये आहे, असे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयनिहाय विभाग करण्यात आले आहेत. त्यानुसार भोसरी रुग्णालय विभागात 229, तालेरा रुग्णालय विभागात 198, थेरगाव रुग्णालय विभागात 135, जिजामाता रुग्णालय विभागात 120 आणि यमुनानगर रुग्णालय विभागात 113 सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील जुन्नर तालुक्यात 660, आंबेगावत 414, शिरूरमध्ये 457, हवेलीत 270 आणि बारामती तालुक्यात 268 सक्रिय रुग्ण आहेत, असेही विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले.

सरत्या आठवड्यातील सक्रिय रुग्ण, कंसात बाधित दर टक्क्यांमध्ये

कोथरूड-बावधन 166 (3.10), औंध-बाणेर 188 (2.0), हडपसर-मुंढवा 175 (1.80), नगररस्ता-वडगावशेरी 167 (2.10) आणि सिंहगड रस्ता 130 (3.20).

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा