ब्रिटनचा खळबळजनक दावा

लंडन : ब्रिटनने ’स्पुटनिक व्ही’ या रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लशीबाबत मोठा दावा केला. रशियाने ऑक्सफर्डच्या ’अ‍ॅस्ट्राजेनेका’ या लशीची ब्ल्यूप्रिंट चोरून आपली स्पुटनिक-व्ही लस तयार केल्याचा दावा ब्रिटनच्या संरक्षण विभागातील सूत्रांनी केला.

सूत्रांनी सांगितले, रशियासाठी काम करणार्‍या गुप्तहेरांनी ’अ‍ॅस्ट्राजेनेका’ कंपनीमधून लशीची ब्ल्यू प्रिंट चोरली. त्यानंतर रशियाने ’स्पुटनिक-व्ही’ लस तयार केली, याचे ठोस पुरावे आहेत. तर, एका परदेशी एजंटने ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका लशीची ब्ल्यूप्रिंट आणि महत्त्वाची माहिती चोरल्याचे माध्यमातील वृत्तामध्ये म्हटले आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मॉस्कोमध्ये झालेल्या सुरुवातीच्या दोन क्लिनिकल चाचण्यांचे परिणाम, निकाल ब्रिटनमधील वैद्यकीय नियतकालिक ’द लॅन्सेंट’मध्ये प्रकाशित झाले होते. रशियन लस ’स्पुटनिक-व्ही’मध्येदेखील ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका लशीचे तंत्रज्ञान वापरल्याची चर्चा सुरू होती.

मागील वर्षी कोरोना महासाथीच्या आजाराने जगभरात थैमान घातले असताना अमेरिका, ब्रिटनसह इतर काही देशांमध्ये लस संशोधन सुरू होते. त्याच दरम्यान ऑगस्ट 2020 मध्ये रशियाने लस विकसित केल्याची घोषणा करत लशीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरीही दिली होती. रशियाच्या या घोषणेनंतर जगभरात खळबळ उडाली होती. रशियाच्या ’स्पुटनिक-व्ही’वरही अनेक पाश्चिमात्य देशांनी प्रश्नचिन्ह उभे केले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा