डेहराडून : लग्नासाठी इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. एका छोट्या स्वार्थासाठी हे सर्व घडत होते असे सांगतानाच, हिंदू कुटुंबे आपल्या मुलांना धर्माचा अभिमान बाळगण्यासंबंधी, परंपरा आणि मूल्यांचे शिक्षण देत नव्हती, असेही ते म्हणाले.

उत्तराखंडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, धर्मांतर कसे होते? आपल्या देशातील मुले, मुली इतर धर्मात कसे काय जातात? छोट्या छोट्या स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी. करणारे चुकीचे आहेत हा मुद्दा वेगळा आहे; पण आपण आपली मुले तयार करत नाही, असे ते म्हणाले.

मोहन भागवत यांनी यावेळी भारतीय कौटुंबिक मूल्ये आणि त्यांचे जतन करण्याबद्दलही सांगितले. तसेच ’आरएसएस’च्या अनेक कार्यक्रमांमध्ये फक्त पुरुषच दिसतात हा मुद्दाही उपस्थित केला. हिंदू समाज संघटित करणे हाच ’आरएसएस’चा मुख्य हेतू आहे; पण जेव्हा आम्ही आरएसएसचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आम्हाला फक्त पुरुषच दिसतात. जर संपूर्ण समाज संघटित करायचा असेल, तर यामध्ये 50 टक्के महिला असल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

भागवत यांनी यावेळी पालकांना आपली मुले ’ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर काय पाहतात यासंबंधी काळजी घेण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले की, ’ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व काही पाहायला मिळते. आपणच मुलांना घरात काय पाहायला हवे आणि काय नको हे शिकवण्याची गरज आहे.’

भागवत यांनी यावेळी भारतीय कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व समजावून सांगताना ही मूल्ये नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप केला. ’लोकांना आपले गुलाम बनवण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनमध्ये ओपियम पाठवले. तरुण त्याच्या आहारी गेले आणि पाश्चिमात्य देशांनी चीनवर राज्य केले. आपल्या देशातही हेच सुरू आहे. तुम्ही अमली पदार्थांची प्रकरणे पाहिलीत आणि ते कुठून येतात हे पाहिलेत तर ते का, कशासाठी येत आहेत आणि याचा कोणाला फायदा होत आहे हे तुम्हाला समजेल’, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा