पुणे : नैऋत्य मोसमी वार्‍यांचा (मान्सून) परतीचा प्रवास सुरू आहे. संपूर्ण विदर्भातून मान्सून माघारी परतला आहे. तसेच मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सून परतला आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भागासह तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागातून मान्सून परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला.

                मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. मागील बुधवारी पश्चिम राजस्तान आणि लगतच्या गुजरात राज्याच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली होती. त्यानंतर दोन दिवसात शुक्रवारी वायव्य भारतातून मान्सून परतला. शनिवारी मान्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला. सोमवारी संपूर्ण झारखंड, बिहारसह मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या आणखी काही भागासह, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागातून मान्सून परतला. तसेच मंगळवारी गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नॅगालॅन्ड, मणिपूर, तेलंगणा, मिझोराम आणि त्रिपुरा आदी राज्यातील काही भागातून मान्सून परतला असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले. परतीची सीमा सिलीगुडी, मालदा, शांतीनिकेतन, मिदनापूर, बारीपाडा, चिंचवाडा, इंदोर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदर होती. देशाच्या आणखी काही भागातून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. मान्सूनच्या परतीसाठी निर्माण झालेले पोषक हवामान कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्य भागातूनही मान्सून लवकरच माघारी परतेल. तसेच राज्यातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह मुसळधार ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

उर्वरित महाराष्ट्रातूनही लवकरच माघार

  संपूर्ण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागातून मान्सून परतला आहे. येत्या दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आणखी काही भागातून मान्सून परतण्यास पोषक स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून मात्र अद्याप मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात झालेली नाही. मात्र पोषक स्थिती कायम राहिल्यास या भागातूनही लवकरच मान्सून माघारी परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा