पुणे : प्रतिभासंपन्न कवयित्री शांता शेळके यांच्या जन्म शताब्दी वर्षांला आज (मंगळवार) पासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त विविध संस्थांकडून वेगवेगळ्या वाङ्मयीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड साहित्य परिषदेतर्फे आज (मंगळवारी) शांताबाई शेळके जन्मशताब्दी काव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र तसेच बृहन्महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील 100 मान्यवर शांताबाईंच्या 100 कविता सादर करुन त्यांना अभिवादन करणार आहेत. हा महोत्सव आज सायंकाळी 5 वाजता ऑनलाइन होणार आहे.

या काव्य महोत्सवाचे उद्घाटक ज्येष्ठ कवी व गीतकार प्रवीण दवणे करणार आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित असणार आहेत. गायिका प्रांजली बर्वे स्वागत गीत सादर करणार आहे. अशी माहिती पिंपरी-चिंचवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली.

कविता, गीतातून उलगडल्या शांताबाई

गोल्डन मेमरीजतर्फे ’आठवणीतल्या शांताबाई’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मराठीत गाजलेल्या गीतांचे सादरीकरण, तसेच कविता आणि ललित लेखनाच्या अभिवाचनातून कवयित्री शांता शेळके यांच्या साहित्याचा आणि आठवणीचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती चैत्राली अभ्यंकर यांची होती आणि हेमंत वाळुंजकर आणि चैत्राली अभ्यंकर यांनी गीत गायन केले. सांगीतिक साथ केदार परांजपे प्रसन्न बाम, राजेंद्र हसबनीस, ऋतुराज कोरे यांनी केली. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेत पार पडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा