अहमदाबाद : गुजरातमधील अदानी बंदरावर 3 हजार किलोग्रॅम हेरॉईन हे अमली पदार्थ सापडल्यानंतर अदानी समूहाने मोठा निर्णय घेतला असून, त्यानुसार यापुढे इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील मालवाहू जहाजांना अदानी बंदरावर प्रवेश बंद असेल, असे समूहाने म्हटले आहे. याची सुरुवात 15 नोव्हेंबरपासून होणार आहे.

अदानी समूहाने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली. यात त्यांनी म्हटले आहे की, 15 नोव्हेंबरपासून अदानी बंदर इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या जहाजांना बंदरावर प्रवेश देणार नाही. हा नियम अदानी समूहाकडून चालवल्या जाणार्‍या सर्व बंदरांना लागू असणार आहे. पुढील सूचना येईपर्यंत या 3 देशांमधील जहाजांना अदानी बंदरावर बंदी असेल.

16 सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातमधील अदानी समूहाकडून चालवल्या जाणार्‍या मुंद्रा बंदरावर जवळपास 3 हजार किलोग्रॅम हेरॉईन या अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. यानंतर देशभरात ठिकठिकाणी या संदर्भात छापेमारी झाली. यात 8 जणांना अटक करण्यात आली. त्यात अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत महसूल गुप्तचर संचालनालयाने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली. 21 सप्टेंबरला दिल्लीत एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली. यात काही अफगाणिस्तानच्या नागरिकांचाही समावेश आहे. त्यांना दिल्लीत कोकेन आणि हेरॉईनसह अटक करण्यात आली होती.

कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरावर 16 सप्टेंबर रोजी सापडलेली 3 हजार किलोग्रॅम अमली पदार्थांची खेप मुळात अफगाणिस्तानातून इराणमार्गे भारतात पाठवण्यात आली. इराणच्या अब्बास बंदरावरून 2 कंटेनर भारतात पाठवण्यात आले होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत या चोरट्या व्यापारावर कारवाई केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा